Accident  Pudhari Photo
सोलापूर

Solapur Accident: सिमेंट मिक्सरचे वाहन पायावरून गेल्याने महिलेचा मृत्यू

टेंभुर्णीत अतिक्रमणे व बेशिस्त वाहतुकीचा बळी;कारवाईची मागणी

पुढारी वृत्तसेवा

टेंभुर्णी : शहरातील अतिक्रमणे व बेशिस्त वाहतुकीचा फटका सर्वसामान्यांना सतत बसत आहे. याचा नुकताच प्रत्यय आला. मंगळवारी सायंकाळी 5 च्या सुमारास करमाळा चौकात भरदिवसा भरधाव वेगाने आलेल्या पिवळ्या रंगाच्या सिमेंट मिक्सरने मागून दुचाकीस धडक दिल्याने दुचाकीवरील महिलेच्या पायावरून मिक्सरचे चाक गेले. खाली रस्त्यावर जोरात आदळल्यामुळे गंभीर जखमी झाल्या. उपचारास घेऊन जात असताना त्यांचा मृत्यू झाला. त्यांचे पती किरकोळ जखमी झाले.

लंकाबाई ज्ञानदेव गदादे (वय 57) असे मयत महिलेचे नाव आहे. तर ज्ञानदेव गदादे (वय 60) असे जखमी पतीचे नाव आहे. दोघे बिजवडी रोड इंदापूर येथील राहणारे आहेत. ज्ञानदेव गदादे व त्यांच्या पत्नी लंकाबाई हे त्यांच्याकडील दुचाकीवरून नातेवाईकांना (भाचीस) भेटण्यासाठी माढा तालुक्यातील वेणेगाव येथे गेले होते. नंतर टेंभुर्णी येथील कुटे वस्तीवरील लंकाबाई यांच्या बहिणीस भेटून आले होते. मंगळवारी सांयकाळी ते 5 च्या सुमारास करमाळा चौकात आले असता मागून आलेल्या पिवळ्या रंगाच्या सिमेंट मिक्सरने भरधाव वेगात दुचाकीस जोरदार धडक दिली.यामध्ये लंकाबाई गदादे यांच्या पायावरून मिक्सरचे चाक गेल्याने त्यांच्या पायाचा चेंदामेंदा झाला. तसेच रोडवर आढळल्याने त्या गंभीर जखमी झाल्या.त्यांना अकलूज येथे उपचारास घेऊन जात असताना रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

टेंभुर्णी शहर हे अनेक महामार्गानी जोडलेले गाव असल्याने या शहरात दुचाकी, चारचाकी, मालट्रक, कंटेनर, सिमेंट बल्कर, अवजड वाहने, शाळेची वाहने, ऊस वाहतुकीची वाहने यांची सतत वर्दळ असते. अत्यंत बेफिकिरीने काहीजण वाहने चालवितात. याकडे कुणीही लक्ष देत नाही.अनेक वाहने उलट दिशेने ये-जा करतात.तसेच रस्त्यावर अतिक्रमण केलेली दुकाने,थांबलेली वाहने यामुळे नागरिकांना ये-जा करताना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. लहान मुले, वृद्धांना यांना रस्ता ओलांडताना कसरत करावी लागते. चौकात स्पीड ब्रेकर नाहीत. वाहतूक पोलिस कर्मचारी नसतात. याबाबत वरिष्ठ स्तरावरून कारवाई करण्याची नागरिकांची मागणी आहे. तसेच सुसाट वाहनांवरही कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT