मोहोळ : मोटरसायकलला अचानक मेंढी आडवी येऊन धडकल्याने मोटरसायकल घसरून झालेल्या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला. हा अपघात मोहोळ- पंढरपूर- आळंदी पालखी महामार्गा वरील पेनुर शिवारातील माने वस्ती जवळ मंगळवार दि. २७ रोजी दुपारी १:४० वाजता झाला. मंगल नवनाथ चवरे वय ५४ रा . पेनुर असे मृत महिलेचे नाव आहे.
याबाबत मोहोळ पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मृत मंगल व त्यांचा मुलगा अभिजीत चवरे हे दोघे मोहोळ येथे मोटरसायकलवर कामानिमित्त आले होते. ते मोहोळ येथील काम आटोपून पुन्हा पेनुर कडे जात असताना माने वस्ती जवळ अचानक त्यांच्या मोटरसायकलला रस्त्याच्या कडेला चरत असलेली एक मेंढी आडवी आली व धडकली.
त्यावेळी मंगल चवरे या मोटारसायकल वरून उडुन रस्त्यावर पडल्या. त्यामुळे त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागून त्या जखमी झाल्या. दरम्यान त्यांना तातडीने उपचारासाठी मोहोळ येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी तपासून त्यांना उपचारा पूर्वीच मृत घोषित केले. या घटनेची खबर संतोष संभाजी शेंबडे रा. कोन्हेरी यांनी मोहोळ पोलिसात दिली असून, अधिक तपास अपघात पथकाचे हवालदार अतुल क्षीरसागर करीत आहेत.