दक्षिण सोलापूर : भरधाव डंपरने दुचाकीला जोरदार धडक दिली. यात दुचाकीवरील तीन कामगारांचा जागेवरच मृत्यू झाल्याची घटना दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्री येथे मंगळवारी सकाळी घडली.
मुस्ती येथील रहिवासी असलेले देविदास दुपारगुडे (वय 40), नितीन वाघमारे (35), हनुमंत राठोड (40) हे तीन कामगार कामासाठी मुस्तीहून धोत्रीकडे दुचाकीने निघाले होते. धोत्री तलावाजवळ आल्यानंतर भरधाव वेगाने येणार्या डंपरने त्यांना उडवले. यात तिघेही गंभीर जखमी झाले. डंपरचालक पसार झाला. तिघांनाही शासकीय रुग्णालयात नेण्यात आले.
मात्र, उपचारापूर्वीच ते मयत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या अपघाताची माहिती मिळताच वळसंग पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकार्यांनी घटनास्थळी भेट दिली. याबाबत अद्याप पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला नाही. शवविच्छेदनाच्या अहवालानंतर सिव्हिल चौकीतून वळसंग पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आल्यानंतर वळसंग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होणार असल्याचे सांगण्यात आले.
या दुर्दैेवी घटनेनंतर मुस्ती गावावर शोककळा पसरली. मृतांचे नातेवाईक आणि गावकर्यांनी शासकीय रुग्णालयात गर्दी केली होती. हातावरचे पोट असणार्या कामगारांवर अचानक काळाने घाला घातल्याने त्यांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला.