बार्शी : बार्शी ते कुर्डूवाडी बाह्यवळण रस्त्यावरील बी.आय.टी. कॉलेजसमोरील रस्त्यावर मंगळवारी सायंकाळी भीषण अपघातात शिक्षक व त्यांच्या ११ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. राजेश सोनवणे आणि मुलगा तेजस सोनवणे (रा. सुखदेव नगर) अशी त्यांची नावे आहेत.
दोघांनाही मागून आलेल्या पांढऱ्या रंगाच्या कार (क्र. MH १३ EX २२८२) चालकाने जोराची धडक दिली. अपघातानंतर चालक महेश नानासाहेब काजळे (रा. अरणगाव ता. बार्शी) याने पळ काढला. जखमींना ग्रामीण रुग्णालय बार्शी येथे दाखल केले असता डॉक्टरांनी वडील राजेश यांना तपासणीपूर्वीच मृत घोषित केले.
गंभीर तेजस याला पुढील उपचारासाठी जगदाळे मामा हॉस्पिटल येथे हलवण्यात आले. मात्र उपचारादरम्यान आज बुधवारी (दि. २२) सकाळी मृत्यू झाला. पळून गेलेल्या गाडीचा शोध घेऊन कार चालकाला येरमाळा येथून ताब्यात घेतले.