मंगळवेढा : सद्गुरू बैठकीस निघालेल्या सासू व सूनेचा कंटेनर अंगावर पडून जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवेढ्यात घडली. ही घटना रविवार 3 ऑगस्ट रोजी सकाळी घडली. अपघातात या दोन्ही महिलांचा मृतदेह छिन्नविच्छीन्न झाला होता. रेणुका विजय तासगावकर (वय 35), शालन पांडुरंग तासगावकर (वय 56 रा. धर्मगाव रस्ता मंगळवेढा) अशी त्यांची नावे आहेत. घटनेची फिर्याद मृत महिलेचा पती विजय पांडूरंग तासगावकर यांनी दिली आहे.
कारखाना चौक येथे रेणुका तासगावकर आपल्या सासू शालन यांना डबलसीट घेऊन जात होत्या. रस्त्यावरच मालट्रक नंबर (एच.आर.38 ए.सी.3672) कंटेनर थांबलेला होता. या कंटेनरला पाठीमागून दुसरी भरधाव वेगाने आलेला ट्रक (के.ए.01.ए.6291) ने धडक दिली. भरधाव वेगामुळे कंटेनर ट्रक स्कुटीवरील रेणुका व सासू शालन यांच्या अंगावर पलटी झाला. त्यात गंभीर जखमी होवून त्यांचा जागीच मृत्यू झाला.या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अंकुश वाघमोडे करीत आहेत. दोन्ही महिलांच्या मृतदेहाना मंगळवेढा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. डॉ. सुलोचना जानकर यांनी मृतदेहाचे शवविच्छेदन प्रक्रिया पूर्ण केली.