मळोली : वेळापूरहून मळोलीकडे दुचाकीवरुन येत असताना समोरुन आलेल्या कारने समोरासमोर जोराची धडक दिल्याने दुचाकीवरील दोन युवक ठार झाले. तर एक गंभीर जखमी झाला. हा अपघात अकलूज -सांगोला रोडवरील मळोलीत रविवारी सकाळी ११ वाजता घडला.
रोहन गणपत जाधव (वय २४, रा.मळोली) मयूर सुखदेव शिंदे (वय २४, रा.मळोली) असे गंभीर जखमी होऊन मृत झालेल्यांची नावे आहेत. सागर तुळशीराम मगर (वय २५, रा.निमगाव मगर) असे गंभीर जखमीचे नाव आहे. रविवारी सकाळी ११ च्या सुमारास वाजता एकाच मोटारसायकलवरुन तिघेजण वेळापूरहून मळोलीच्या दिशेने जात होते. मळोलीमध्ये येताच समोरुन आलेल्या कारने मोटारसायकलला जोरदार धडक दिली.
अपघाताची तीव्रता एवढी भीषण होती की, मोटारसायकलवरील एका युवकाचा पाय जाग्यावरच तुटून पडला. तर कार सुमारे दीडशे फूट ब्रेक लावत बाजूच्या गटारात जाऊन पडली. जखमींना रुग्णालयात नेताना रोहन जाधव, मयूर शिंदे यांची प्राणज्योत मालवली. तर जखमी सागर मगर उपचार घेत आहे.
अपघातात दोन्ही गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. प्रतिक्षदर्शीनी सांगितले की, कारचे महिला चालवत होती. तिला गाडीवर लवकर ताबा मिळवता आला नाही. जखमी सागर तुळशीराम मगर हा युवक इलेट्रिक काम शिकण्यासाठी रोहन जाधव यांच्याकडे येत होता. रोहन व मयुर हे दोघे मोटार रिवायडींगचा व्यवसाय करत होते.