Fraud Case 
सोलापूर

Solapur Loan Fraud : कर्जाच्या अमिषाने ७७ लाखांचा गंडा

पैसे परत मागितल्यानंतर लॉरेन्‍स बिश्नोई गँगचा शूटर असल्याची दिली धमकी

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : छत्रपती संभाजीनगर परिसरातील गोल्डन टॉवर प्रकल्पासाठी तब्बल १५ कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करून देण्याचे आमिष दाखवत सोलापुरातील एका व्‍यावसायिकाकडून ७७ लाख २५ हजार रुपये उकळल्याचा प्रकार समोर आला आहे. पैसे परत मागितल्यावर आम्‍ही लॉरेन्‍स बिश्नोई गँगचे शूटर असल्याचे सांगत जीवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी विजापूर नाका पोलिस ठाण्यात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

समीर वाल्मीक अहिरे (रा. स्वामी विवेकानंद नगर, सैफुल) यांनी फिर्याद दिली आहे. छत्रपती संभाजीनगर येथील गोल्डन टॉवर प्रकल्पासाठी १५ कोटी रुपयांचे कर्ज कोणतीही फी, कमिशन किंवा स्टॅम्प ड्युटी न घेता युनायटेड हेल्थ मॅनेजमेंट सर्व्हिसेस कंपनीकडून मिळवून देण्याचे आश्वासन संशयित आरोपींनी दिले.

लिगल पेपर करून देतो म्‍हणून प्रथम दोन लाख रुपये घेतले. त्‍यानंतर कंपनीची कर्जविषयक पॉलिसी बदलल्याचे सांगण्यात आले. १५ कोटी रुपयांच्या कर्जासाठी ७५ लाख रुपये स्टॅम्प ड्युटी भरावी लागेल, असे सांगून फिर्यादीकडून ५० लाख रुपये घेतले. त्‍यानंतर पुन्‍हा फिर्यादीच्या माध्यमातून संतोष राठोड आणि मनोज सुरवसे यांच्याकडून छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर येथे २५ लाख २५ हजार रुपये घेण्यात आले. कंपनीच्या माध्यमातून १५ कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करून देण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर खोट्या लोन मंजुरी पत्रावर फिर्यादीची स्वाक्षरी घेण्यात आली त्‍यांच्‍याकडून १२ कोरे धनादेशही घेतले.

या कागदपत्रांवर तहसीलदार अथवा सब-रजिस्ट्रार यांच्या सहीचा उल्लेख असल्याचेही सांगण्यात आले. त्यानंतर आरोपींनी सब-रजिस्ट्रार कार्यालय, सोलापूर क्रमांक दोन येथील सही व शिक्का मारून तो खोटा असल्याचे कारण सांगून कर्ज प्रकरण नामंजूर केल्याचे सांगितले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच अहिरे यांनी पोलिसात धाव घेतली. त्यांच्या फिर्यादीवरून हरजित सिंग रुपवाह, धर्मेंद्र विनोदानंद झा, आरव अग्रवाल, अशोक सिंघल, दीपक अरोरा, मोहिनी धर्मेंद्र झा आणि गणेश देशमुख (सर्व रा. छत्रपती संभाजी नगर व दिल्‍ली) या सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक मस्‍के करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT