सोलापूर : शहरातील ७४ नाल्यांमुळे शहर विकासावर मर्यादा येणार आहेत. ही बाब पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. या नाल्यांचे फेरसर्वेक्षण करण्यासंबंधीचा प्रस्ताव सभागृहापुढे मांडा, अशा सूचना दिल्या आहेत. त्यामुळे सभागृहात तातडीचा विषय आणणार असल्याचे सभागृहनेते नरेंद्र काळे यांनी सांगितले.
एकीकडे महापालिका प्रशासनाकडून लेआऊट मंजूर केला जातो. नागरिकांना बांधकाम परवाने दिले जातात आणि अचानक एकेदिवशी लोकांच्या घरामधून नाला नेला जातो. हे योग्य नाही. शहरात नाले रेखांकन करताना प्रशासनाकडून कोणत्याही पध्दतीचा तांत्रिक अभ्यास न करता शहरात ७४ नाल्यांचे रेखांकन केले.
शहराला या ७४ नव्या नाल्यांची खरीच गरज आहे का? पाण्याची लेव्हल कुठून आहे? त्याने पावसाच्या पाण्याचा निचरा होईल का? या मुद्द्यांवर अभ्यास करण्यात आला नसल्याचे सध्याच्या परिस्थितीवरून दिसून येत आहे. त्यासाठी या नाल्यांचे फेरसर्वेक्षण करणे आवश्यक आहे. त्यासाठी पालकमंत्री गोरे यांच्याशी चर्चा केली.
शहरातील विकासाला कशा पद्धतीने ब्रेक लागणार हे निदर्शनास आणून दिले. त्यानंतर पालकमंत्री यांनी सभागृहात प्रस्ताव आणण्याबाबत सांगितले. त्यानुसार ७४ नाल्यांचे फेरसर्वेक्षण करण्याबाबत रेखांकन करण्याचा प्रस्ताव सभागृहात आणणार असल्याचे काळे यांनी सांगितले.