सोलापूर

Solapur News: कान, नाक व घशांच्या वर्षाकाठी 7200 जणांवर होतात शस्त्रक्रिया

शासकीय रुग्णालय; कान, नाक आणि घसा विभाग

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : येथील श्री. छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रुग्णालयात कान, नाक व घसा या विभागात दररोज किरकोळसह वीसपेक्षा अधिक शस्त्रक्रिया होतात. वर्षाकाठी ही संख्या सात हजार 200 हून अधिक असून दरमहा सहाशेच्या जवळपास रूग्णांवर शस्त्रक्रिया केली जाते. शिवाय, येथील तज्ञ डॉक्टरांकडून उपचार घेऊन कान, नाक व घशाच्या त्रासातून बाह्य रुग्ण विभागातीलही शंभराहून अधिक रुग्ण मुक्त होत आहेत.

येथील शासकीय रुग्णालयात दररोज मोठ्या प्रमाणात अनेक रुग्ण विविध आजारावरील उपचारासाठी येतात. शहरात जिल्हा व महापालिकेचेही रुग्णालये आहेत. पण, रुग्णांचा याच रुग्णालयाकडे कल अधिक आहे. कान, नाक व घसा या आजारावरील उपचार घेणाऱ्या रुग्णांची देखील मोठी आहे. यासाठी येथे स्वतंत्र विभाग काम करते. या विभागात रुग्णांची वेळोवेळी तपासणी करताना रुग्णांच्या स्थितीवरून एक्सरे व सोनोग्राफी देखील केली जाते. रक्तासह अन्य तपासण्यानंतर शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला जातो. काही वेळेला रुग्णांना शस्त्रक्रियेची तारीख सुद्धा दिली जाते.

रुग्णाच्या स्थितीनुसार तत्काळही ऑपरेशन करावे लागते. काही रुग्णांवरील ऑपरेशन हे राज्य शासनाच्या महात्मा फुले जनआरोग्य व पंतप्रधान जन आरोग्य योजनेअंतर्गत केले जाते. तर, ज्या रुग्णांकडे कागदपत्रांचा अभाव असतो. त्यांच्यावर शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार आरोग्य सेवा दिली जाते. ज्या रुग्णांची मधुमेह नियंत्रित नसते. अशा रुग्णावर शस्त्रक्रिया करताना रूग्णाला खूपच त्रास होतो. अशांनी मधुमेह नियंत्रित करावा.

लहान वस्तू देऊ नये

लहान मुलांच्या हातात प्लास्टीकच्या बारीक खेळण्या, नाणी यासह घरातील लहान वस्तू देऊ नका. अशा वस्तू मुले तोंडात घालतात. अनावधनाने ते गिळतातही. ते जर पोटात जाण्याऐवजी श्वसननलिकेत जाऊन अडकल्यास लहानग्याच्या जिवावरही बेतू शकते.

नाकातल्या गाठी काढणे व नाकात वाढलेली मांस व नाकातील वाकडी झालेली हाडे असे रूग्ण शासकीय रुग्णालयात अधिक येतात. धुळीमुळे कान, नाक व घशाचा त्रास होतो. सर्दीकडे दुर्लक्ष करणेही काही वेळा त्रासदायक होते. म्हणून, वेळीच उपचार घेणे गरजेचे आहे. तसेच, अन्य आजारही बळावतात. घशातील कॅन्सरच्या गाठी काढण्यासाठीच्या शस्त्रक्रियेला काही वेळा आठ तासांचा वेळ लागतो.
डॉ. वंदना थोरवडे, विभाग प्रमुख कान नाक घसा विभाग शासकीय रुग्णालय

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT