सोलापूर : सोलापूर जिल्हयातील 701 ग्रामपंचायतींमधील प्रभागनिहाय आरक्षण निश्चित कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यानुसार येत्या 8 जून रोजी विशेष ग्रामसभेची नोटीस प्रसिद्ध करून येत्या 12 जून रोजी विशेष ग्रामसभा घ्यावी, असे पत्र राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
सन 2024, सन 2025 मध्ये मुदत संपलेल्या आणि 2026 अखेर मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने अस्तित्वात आलेल्या ग्रामपंचायतीमधील प्रभागांचे आरक्षण निश्चित केले जाणार आहे. यात अनु.जाती, अनु. जमाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, अनु. जाती महिला, अनु. जमाती महिला, नागरिकांचा नागासवर्ग प्रवर्ग महिला व सर्वसाधारण महिला आरक्षण निश्चित केले जाणार आहे.
19 ते 25 जून दरम्यान प्रभागनिहाय आरक्षण निश्चितीबाबत हरकती व सूचना दाखल करता येणार आहे. 3 जुलै पर्यंत उपविभागीय अधिकारी यांनी प्राप्त हरकती विचारात घेऊन अभिप्राय देणार आहेत. 8 जुलै रोजी आरक्षणाची अंतिम यादी प्रसिध्द केली जाणार आहे.