सोलापूर : मतदार यादी शुद्धीकरण आणि विशेष संक्षिप्त पुनर्निरीक्षण (एसआयआर) मोहिमेंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील मतदार यादी मॅपिंगचे काम शंभर टक्के पूर्ण झाले आहे. जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघांतील ३९ लाख ४१ हजार ९५ मतदारांपैकी ३३ लाख २७ हजार ४८३ मतदारांचे अर्ज डिजिटायझेशन झाले. यात ६ लाख १३ हजार मतदार एसआयआरपासून अलिप्त राहिले आहेत. यामध्ये मयत, स्थलांरित मतदारांचा समावेश आहे. ते मतदार यादीतून वगळले जाणार आहेत.
मतदार वगळण्याच्या यादीमध्ये गैरहजर, स्थलांतरित, दुबार अथवा मयत मतदारांचा संभाव्य समावेश आहे. अर्थात, आता मतदारांबाबत दावे व हरकती मागवून सुनावणी झाल्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल. त्यानंतरच अंतिम मतदार यादी २९ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध होईल.
विधानसभानिहाय अलिप्त मतदार
करमाळा : ४८,०६६, माढा : ३७,४७८, बार्शी : ४९,२३४, मोहोळ : ३७,१६८, सोलापूर शहर उत्तर : ६७,८०१, सोलापूर शहर मध्य : १,१७,०६४, अक्कलकोट : ६५,६४३, सोलापूर दक्षिण : ५७,०८२, पंढरपूर : ६२,२२७, सांगोला : ३४,२१८, माळशिरस : ३७,६२९, एकूण ६,१३,६१० मतदार एसआयआरपासून अलिप्त राहिले आहेत.