सोलापूर : यंदाची आषाढी एकादशी ही येत्या २५ जुलै रोजी होत असून यासाठी राज्यासह परराज्यातूनही हजारो वारकरी येतात. या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वे सोलापूर विभागाकडून तब्बल ५४ विशेष रेल्वे गाड्या धावणार आहेत. यात आरक्षित व अनारक्षित डब्यांद्वारे सुरक्षित, सुलभ व आरामदायी प्रवास उपलब्ध करून देण्यात येत आहे.
नागपूर-मिरज, अमरावती-पंढरपूर, खामगाव-पंढरपूर, भुसावळ-पंढरपूर, लातूर-पंढरपूर, कोल्हापूर-कुर्डूवाडी तसेच पुणे-मिरज या मार्गांवर या गाड्या धावतील. यात नागपूर-मिरज, अमरावती-पंढरपूर, खामगाव-पंढरपूर व भुसावळ-पंढरपूर या मार्गांवर प्रत्येकी चार फेऱ्या, लातूर-पंढरपूर मार्गावर आठ फेऱ्या, तर कोल्हापूर-कुर्डूवाडी व पुणे-मिरज मार्गांवर दररोज विशेष गाड्या धावणार आहेत. या गाड्यांमुळे विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र व उत्तर महाराष्ट्रातील भाविकांना थेट किंवा सोयीस्कर रेल्वे संपर्क उपलब्ध असणार आहे. विशेष गाड्यांमध्ये वातानुकूलित, स्लीपर आणि सर्वसाधारण डब्यांची व्यवस्था करण्यात आली असून अनारक्षित गाड्यांमधूनही मोठ्या संख्येने वारकऱ्यांना प्रवास करता येणार असल्याचे सांगण्यात आले.
या विशेष गाड्यांसाठी संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर तसेच आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर तिकीट उपलब्ध राहील. अनारक्षित तिकिटांची सुविधा स्थानकांवरील तिकीट खिडक्या व तसेच रेलवन अॅपद्वारे मिळणार आहे. रेल्वेने आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर केलेली ही व्यवस्था वारकऱ्यांसाठी मोठा दिलासा आहे. वारीसाठी परप्रांतातून तसेच राज्याच्या विविध भागातून ही सोय उपलब्ध असल्याने वारकरी भाविकांतून समाधान व्यक्त होत आहे.