सोलापूर ः शासनाने राज्यातील सर्व शाळांना जिओ टॅगिंग करून भौतिक सोयी-सुविधांची माहिती भरावे, असे आदेश दिले आहेत. मात्र, जिल्ह्यातील 446 शाळांनी सोयी-सुविधांची माहिती अद्यापही भरली नाही. त्यामुळे शिक्षण आयुक्तांच्या आदेशाकडे शाळा दुर्लक्ष करत असल्याचे चित्र दिसत आहे.
भौतिक सोयी-सुविधांची माहिती अॅपवर भरणे बंधनकारक असताना जिल्ह्यात सुमारे साडेचारशे शाळांनी सोयी-सुविधांची माहिती न भरल्याने त्या शाळेत सुविधांचा अभाव असल्याची चर्चा शिक्षकांमध्ये होत आहे. त्यामुळे अशा शाळांवर काय कारवाई होणार याकडे पालकांचे लक्ष लागले आहे. महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अॅप्लीकेशन सेंटर संस्थेद्वारे शालेय शिक्षण विभागातील सर्व प्रकारच्या शाळांचे भौतिक सोयी-सुविधांची ठिकाणे छायाचित्रासह टॅग करून माहिती महास्कूल जीआयएस अॅपवर माहिती भरण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार जिल्ह्यातील दोन हजार 327 शाळांनी माहिती भरली आहे. दरम्यान, याआधीच शिक्षण आयुक्तांच्या सूचनेनुसार प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी गटशिक्षणाधिकारी यांची ऑनलाइन बैठक घेऊन शाळांना जिओ टॅग बंधनकारक केल्याची माहिती दिली. तसेच जिल्ह्यातील शाळांकडून जीआयएस मॅपिंग करून माहिती भरून घेतली. तसेच यावेळी अनेक तांत्रिक अडचणी असल्यामुळे भौतिक सोयी-सुविधांचे फोटो अपलोड करताना मुख्याध्यापक, शिक्षकांना बर्याच अडचणींना सामोरे जावे लागले आहे.
शाळांनी जिओ टॅग करून भौतिक सोयी-सुविधांची माहिती भरणे बंधनकारक केले आहे. त्यानुसार दोन हजार 327 शाळांनी माहिती भरली आहे. तर 446 शाळांनी अद्यापही माहिती भरली नाही. ज्या शाळांनी माहिती भरली नाही. अशा शाळांवर कारवाई करण्यात येणार आहे.कादर शेख, शिक्षणाधिकारी, प्राथमिक