Shivshahi Bus 
सोलापूर

Solapur Shivshahi Bus : सोलापूरच्या ४० शिवशाही बसला देणार लालपरीचा लुक

वाढता देखभाल व दुरुस्ती खर्च तसेच वारंवार उद्भवणाऱ्या तांत्रिक अडचणीमुळे शिवशाहीचे साध्या लाल रंगाच्या एसटी बसमध्ये रूपांतर करण्याचा निर्णय

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : प्रवाशांना आरामदायी व वातानुकूलित प्रवासाची सुविधा देण्यासाठी परिवहन महामंडळाच्या ताफ्यात दाखल करण्यात आलेल्या शिवशाही बस टप्प्याटप्प्याने सेवेतून कमी होणार आहेत. वाढता देखभाल व दुरुस्ती खर्च तसेच वारंवार उद्भवणाऱ्या तांत्रिक अडचणीमुळे शिवशाहीचे साध्या लाल रंगाच्या एसटी बसमध्ये रूपांतर करण्याचा निर्णय महामंडळ प्रशासनाकडून घेण्यात आला आहे.

येथील विभागीय कार्यालयाच्या अंतर्गत ४० शिवशाही बसचे रूपांतर करण्यात येत असून, त्यापैकी आठ बसचे काम महामंडळाच्या दापोलीच्या विभागीय मध्यवर्ती कार्यशाळेत पूर्ण झाले आहे. उर्वरित बसचेही रूपांतर करण्यात येणार असल्याने आगामी काळात शिवशाही बसची संख्या मोठ्या संख्येने घटणार आहे. येथील आगारातून शिवशाही बसची सेवा यापूर्वीच बंद झाली आहे. मात्र, प्रवाशांसाठी ‘शिवाई’ या वातानुकूलित बसची सेवा उपलब्ध आहे.

शिवशाही बसमध्ये पुश-बॅक आसने, सीसीटीव्ही, डिजिटल डिस्प्ले, प्रवाशांच्या सोयीसाठी चार्जिंग पॉईंट्स यांसह विविध आधुनिक सुविधा देण्यात आल्या होत्या. मात्र, या सुविधांच्या देखभालीसाठी होणारा खर्च व तांत्रिक बिघाडांचे प्रमाण वाढत गेल्याने महामंडळासमोर नेहमी आर्थिक आव्हान निर्माण झाले. त्यामुळे खर्च कमी करण्याच्या उद्देशाने बसचे रूपांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

शिवशाहीचा देखभाल दुरूस्तीचा खर्च हा महामंडळासमोर सतत डोकेदुखी झाली होती. म्हणून महामंडळाच्या वरिष्ठ स्तरावरून शिवशाही बसचे रूपांतर लालपरीत करण्याचा निर्णय झाला आहे.
- अमोल गोंजारी, विभागीय व्यवस्थापक परिवहन महामंडळ, सोलापूर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT