सोलापूर : शहरात एमडी ड्रग्ज (मेफोड्रीन) घेऊन फिरणाऱ्यास सोलापूर शहर गुन्हे शाखेने अटक केली. त्याच्याकडून सहा लाख ८० हजार रुपयांचे ३४ ग्रॅम एमडी ड्रग्ज हस्तगत करण्यात आले. रुपेश प्रदिप थडसरे (वय ३४, रा. मित्र नगर, शेळगी, सोलापूर) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.
पोलिस निरीक्षक अरविंद माने यांच्या सूचनेनुसार २९ जुलै रोजी पोलिस उपनिरीक्षक मनोज मोरे पथकासह पेट्रोलिंग करीत असताना छत्रपती संभाजी महाराज पुतळ्याजवळ ब्रिज खाली एक जण संशयितरित्या फिरत असताना दिसला. पोलिसांना पाहून तो पळून जाऊ लागला. त्याला पोलिसांनी पकडून ताब्यात घेतले. नाव रुपेश थडसरे असल्याचे सांगितले. त्याच्या जवळच्या प्लास्टिक पाऊचमध्ये पांढऱ्या रंगाची एमडी ड्रग्ज सदृश्य पावडर मिळाली. फॉरेन्सिक टिमने ही पावडर एमडी ड्रग्ज असल्याचे निष्पन्न केले. ते सहा लाख ८० हजार रुपयांचे एकूण ३४ ग्रॅम एमडी ड्रग्ज होते. ते पोलिसांनी जप्त केले.
संशयीत रुपेश थडसरे याने एमडी ड्रग्ज विक्रीसाठी आणल्याचे कबूल केले. त्याच्यावर फौजदार चावडी पोलिसात गुन्हा दाखल केला. न्यायालयाने त्यास पोलिस कोठडी सुनावली. पोलिस उपनिरिक्षक बनसुडे तपास करीत आहेत. ही कामगिरी पोलिस आयुक्त एम. राज कुमार, पोलिस उपायुक्त डॉ. अश्वीनी पाटील, सहा. उपायुक्त दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. दत्तात्रय काळे, मनोज मोरे, बापू साठे, युवराज गायकवाड, सुभाष मुंढे, सैपन सय्यद, रामेश्वर साखरे, धिरज सातपुते, अभिजीत पवार, शंकर याळगी, बाळू काळे, मच्छिद्र राठोड यांनी पार पाडली.