सोलापूर : सीना नदीला आलेल्या महापुरामुळे 88 गावांत पाणी शिरले. त्यामुळे जनावरांचा चारा, घरातील पशुखाद्य, कडबा, मुरघास वाहून गेल्याने मोफत चारा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. प्रतिदिन 100 मेट्रिक टन चारा लागणार असून, आत्तापर्यंत 1 हजार मेट्रिक टन चार्याची उपलब्धता झाली आहे.
शनिवारी (दि. 27) चारा वाटप करण्यास सुरुवात होईल, अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली. जनावरांच्या चार्यासाठी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली होती. दरम्यान, सांगोला येथून 30 मेट्रिक टन चारा शासकीय डेपोतून ट्रकमधून पुरबाधित गावांकडे शुक्रवारी रवाना झाला. सांगली येथून चारा आणण्यासाठी वाहने गेली आहेत. इतर तीन जिल्ह्यातील जिल्हाधिकार्यांशी चार्याबाबत बोलणे झाले असून, खासगी व्यक्तींनी दिलेल्या चार्यासाठी स्थळे निश्चित केली आहेत.
बाधित 10 किलो तांदूळ, गहू वाटप
पुरग्रस्तांना पुरवठा विभागाच्या बफर स्टॉकमधून प्रतिकुटुंब 10 किलो तांदूळ, 10 किलो गहू दिले जाणार आहे. स्वयंसेवी संस्था, नागरिकांना मदत करायची असेल तर जिल्हा आणि तालुका स्तरावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी केले.