सोलापूर : शहरात गुन्हेगारी कारवाया करत दहशतीचे वातावरण निर्माण करणार्या सालार टोळीविरोधात सोलापूर पोलिसांनी धडक कारवाई करत मोका कायद्यांतर्गत (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम) कठोर पावले उचलली आहेत. पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी या टोळीतील सहा जणांना ‘मोका’ लावला.
नई जिंदगी परिसरात 3 जुलै रोजी उधारीचे पैसे परत मागितल्याच्या कारणावरून सोहेल रमजान सय्यद याच्यावर आरोपी जाफर शेटे, टिपू सालार, फैसल सालार, पापड्या, अक्रम पैलवान, वसीम मुकरी यांच्यासह अन्य 3-4 जणांनी हल्ला केला. फैसल सालार याने सोहेल यास चाकू दाखवत धमकावले आणि पोटात चाकू खुपसण्याचा प्रयत्न केला. यात त्याच्या डाव्या हाताला गंभीर दुखापत झाली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
त्यानंतर पोलिसांनी संघटित गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी पावले उचलली. पोलिसांच्या तपासात वरील आरोपींनी मागील दहा वर्षांत संघटित स्वरूपात गंभीर स्वरूपाचे गुन्हे केल्याचे उघड झाले. यात खुनाचा प्रयत्न, खंडणी, अपहरण, गंभीर मारहाण व धमकी यांचा समावेश आहे. या सर्व आरोपींनी एकाच टोळीचा भाग म्हणून गुन्हे केले असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी 21 जुलै रोजी या आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाईस मंजुरी दिली.
या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने करीत आहे. सोलापूर शहरात गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी ही मोठी आणि महत्त्वपूर्ण कारवाई मानली जात आहे. पोलीस प्रशासनाकडून या प्रकरणी अधिक सखोल तपास सुरू आहे, उर्वरित आरोपींच्या मुसक्या आवळण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
आरोपी फैसल अब्दुल रहीम सालार, जाफर महम्मद युसुफ शेटे, सईद ऊर्फ टिपू अब्दुल रहीम सालार, अनिस अहमद ऊर्फ पापडचा रियाज रंगरेज, अक्रम ऊर्फ पैलवान कय्युम सातखेड व वसीम ऊर्फ मुकरी अब्दुल रहीम सालार यांच्यावर मोका कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.