Murder Case Pudhari
सोलापूर

Karmala Murder Case: सख्ख्या बहिणीने भावाचा गळा दाबून केला खून

पतीच्या मदतीने लावली मृतदेहाची विल्हेवाट

पुढारी वृत्तसेवा

करमाळा : दारू पिऊन सतत त्रास देणाऱ्या भावाचा चिडून जाऊन बहिणीने गळा दाबून खून केला. त्यानंतर तिने पतीच्या मदतीने भावाच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली. मल्हारी पोपट कांबळे (वय 36, रा. केम) असे खून झालेल्या भावाचे नाव आहे. ही घटना तालुक्यातील केममध्ये घडली.

दि. 12 एप्रिल रोजी केम गावातील दत्तात्रय तुकाराम देवकर यांच्या शेतात मकवानाच्या गंजीच्या आडोशाला मल्हारी कांबळेचा मृतदेह आढळला. अकस्मात मृत्यूची नोंद झाली होती. नंतर वैद्यकीय अहवालात गळा आवळल्याने मृत्यू हे कारण स्पष्ट झाले. यानुसार पोलिस निरीक्षक रणजित माने यांनी गुन्हे अन्वेषण पथकासह घटनास्थळी तत्काळ भेट दिली. तपास सुरू केला. पोलिसांनी शीतल राजू केंगार (बहीण), राजेश बापू केंगार (भाऊजी), पोपट यंका कांबळे यांच्याकडे चौकशीही केली. यामध्ये मयताची बहीण शीतल व भाऊजी राजेश यांचे जबाब, हालचाली संशयास्पद वाटल्याने त्यांच्याकडे कसून तपास केला.

पोलिसी खाक्या दाखवताच मृत मल्हारीची बहीण शीतल राजू केंगार हिने खुनाबाबतची माहिती दिली. मल्हारीचा गळा दाबून खून केला. यानंतर पती राजेश बापू केंगार (वय 30, रा. केम, ता. करमाळा) याच्या मदतीने मृतदेहाची विल्हेवाट लावली. याप्रकरणी शीतल व तिचा पती राजू केंगार यांना अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT