TET Exam 2026 Pudhari
सोलापूर

TET Exam: टीईटी देणाऱ्या परीक्षार्थ्यांची बायोमेट्रीक तपासणी

२८ जूनला परीक्षा : २८ हजार परीक्षार्थी देणार परीक्षा

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने रविवारी (दि.२८) जूनला शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) आयोजित करण्यात आली आहे. ही परीक्षा जिल्‍ह्यातील २८ हजार २९८ परीक्षार्थी देणार असून, त्यांची बायोमेट्रीक तपासणी होणार आहे.

शहर व परिसरातील ४७ परीक्षा केंद्रांवर टीईटी परीक्षा होणार आहे. परीक्षा सुरळीत, पारदर्शक आणि गैरप्रकारमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासनाने विविध उपाययोजना केल्या माहिती प्राथमिक शिक्षण विभागाने दिली आहे.

टीईटी परीक्षेचा पेपर एक इयत्ता पहिली ते पाचवीसाठी तर पेपर दोन इयत्ता सहावी ते आठवीसाठी होणार आहे. या परीक्षेसाठी पेपर एकसाठी १२ हजार २६१ तर पेपर दोनसाठी १६ हजार ३७ असे एकूण २८ हजार २९८ परीक्षार्थ्यांनी नोंदणी केली असून, ते परीक्षा देणार आहेत.दरम्यान, परीक्षेला जाताना मूळ फोटो ओळखपत्र आणि त्याची छायाप्रत सोबत बाळगणे आवश्यक आहे. तसेच मोबाईल, स्मार्ट वॉच, ब्लूटूथ, डिजिटल घड्याळ अथवा इतर कोणतेही इलेक्ट्रॉनिक साहित्य परीक्षागृहात नेण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.

वेळेआधीच पोहचा परीक्षा केंद्रावर

परीक्षा केंद्रावर बायोमेट्रिक उपस्थिती आणि तपासणी प्रक्रिया होणार असल्याने परीक्षार्थींनी पेपर-१ साठी सकाळी ८.३० वाजता आणि पेपर-२ साठी दुपारी १२.३० वाजता केंद्रावर उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. सकाळी १०.१० नंतर व दुपारी २.१० नंतर कोणत्याही परीक्षार्थीस प्रवेश दिला जाणार नाही.

लेखनिकसाठी पूर्वपरवानगी घ्या

दिव्यांग परीक्षार्थींना लेखनिकाची आवश्यकता असल्यास शिक्षणाधिकारी (प्राथमिक) कार्यालयाकडून पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. ऐनवेळी परीक्षा केंद्रावर लेखनिकास परवानगी दिली जाणार नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT