सोलापूर : धाराशिवसह सोलापूर जिल्ह्यात पावसाने हाहाकार माजविला असून, आभाळ फाटल्यासारखी अतिवृष्टी सुरू आहे. सीना कोळेगाव, खासापुरी, भोगावती, चांदणी धरणातून सुमारे सव्वादोन लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग सीना नदीत येत असल्याने महापुराचे संकट निर्माण झाले आहे. याचा फटका सोलापूर जिल्ह्यातील 7 तालुक्यांना बसत आहे.
सीना नदीत येत?असलेल्या विसर्गाचा फटका माढा, करमाळा, बार्शी, मोहोळ, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट तालुक्याच्या पश्चिम भागाला बसत आहे. त्यामुळे प्रशासनाने सोमवारी सकाळपासून नदीकाठीच्या गावी जाऊन नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे प्रयत्न सुरू केले होते.
रविवारी (दि. 21) रात्री बार्शी तालुक्यात पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात पाऊस पडला. गेल्या 50 वर्षांनंतर एवढा मोठा पाऊस पडल्याने चांदणी नदीला महापूर आला. हजारो हेक्टर क्षेत्रातील पिके पाण्याखाली गेली. बार्शी-तुळजापूर रोड वाहतुकीसाठी बंद झाला. चांदणी धरणातून 48 हजार 541 क्युसेक पाण्याचा विसर्ग सीना नदीत येत आहे. अतिवृष्टीमुळे चांदणी नदीला महापूर आल्याने बेलगाव, मांडेगाव, आगळगाव, धसपिंपळगाव, खडकलगाव, देवगाव, कांदलगाव आदी गावांत पाणी शिरले आहे. अनेक गावांतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. अतिवृष्टी व पुरामुळे शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे. पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे पिकांबरोबर माती देखील वाहून गेली आहे.
सीना नदीकाठच्या शिवणी गावाला दोन्ही बाजूने पुराचा वेढा पडतो. सीना नदीतून दोन लाखांचा विसर्ग येत असल्याने पाकणी, शिवणी, तिर्हे, पाथरी, तेलगाव डोणगाव, नंदुर या नदीकडच्या गावामध्ये मोठ्या प्रमाणात पुराचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. सीना नदीचे पाणी पुढे दक्षिण सोलापूर-अक्कलकोट तालुक्याच्या सीमेवर कुडल संगम येथे भीमा नदीत मिसळत असल्याने भीमा नदीलाही पुराचा धोका निर्माण होणार आहे. भीमा नदीतून सोमवारी सकाळी 70 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता.
नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यास सुरुवात
माढा, करमाळा, बार्शी, मोहोळ, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोटमध्ये प्रशासन तत्पर
बार्शीत 50 वर्षांतील मोठा पाऊस
मुख्यमंत्र्यांसह आमदार लागले कामाला
सीना नदीत दोन लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग येत असल्याच्या माहितीनंतर दक्षिण सोलापूरचे आ. सुभाष देशमुख, माढ्याचे आ. अभिजित पाटील यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले. सोलापूर जिल्ह्यातील अनेक तालुके आणि लगतच्या भागात, तसेच मराठवाड्यातील धाराशिव, बीड आणि जालना येथे जोरदार पाऊस पडत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे परिस्थितीवर लक्ष ठेवून स्थानिक प्रशासनाशी संपर्कात आहेत. जलसंपदा विभागाने खबरदारी घ्यावी आणि जिल्हाधिकार्यांशी सातत्याने समन्वय ठेवावा, असे निर्देश त्यांनी दिले आहेत.