पोखरापूर : सिकंदर शेख यास चांदीची गदा व मानपत्र देताना राष्ट्रवादीचे उमेश पाटील व इतर.  Pudhari Photo
सोलापूर

सिकंदर शेख नागनाथ केसरी कुस्तीचा ठरला मानकरी

Sikandar Sheikh | बॅकथ्रो डावावर शेखने भारत केसरी भोला पंजाबीला दाखविले अस्मान

पुढारी वृत्तसेवा

पोखरापूर : प्रेक्षकांनी खचाखच भरलेले मैदान, प्रचंड उत्कंठा, टाळ्या अन् हलग्यांच्या आवाजाने गजबजलेल्या श्री नागनाथ केसरी कुस्ती समितीच्या आखाड्यात प्रथम क्रमांकाची कुस्ती मोहोळ येथील महाराष्ट्र केसरी पै. सिकंदर शेख व भारत केसरी हरियाणाचा पै. भोला पंजाबी यांच्यात झाली. बॅकथ्रो डावावर सिकंदर शेख याने भोला पंजाबी याला आसमान दाखवत बक्षिस पटकाविले.

या कुस्ती आखाड्याचे उद्घाटन नागनाथ महाराजांचे मानकरी राजेंद्र खर्गे महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. मोहोळचे आमदार राजाभाऊ खरे यांच्या वतीने प्रथम क्रमांकाच्या कुस्तीसाठी दोन लाख रुपये बक्षीस व कै. जयवंत धोत्रे यांच्या स्मरणार्थ चांदीची गदा असलेली कुस्ती सिकंदर शेख यांनी जिंकली. द्वितीय क्रमांकाची भीमा कारखान्याचे अध्यक्ष विश्वराज महाडिक यांच्यावतीने 50 हजार रुपये बक्षीस असलेली कुस्ती अंकुश बंडगर व प्रदीप ठाकूर यांच्यात झाली. यामध्ये घिस्सा डावावर अंकुश बंडगरने प्रदीप ठाकूर याला चितपट केले. सिकंदर शेख याला बक्षीस व चांदीची गदा राष्ट्रवादीचे माजी मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांच्या हस्ते देण्यात आली.

यावेळी मोहोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे, सोलापूरचे नगरसेवक चेतन नरोटे, माजी नगराध्यक्ष रमेश बारसकर, अ‍ॅड. विनोद कांबळे, हनुमंत कसबे, नागनाथ विद्यालयाचे प्राचार्य बशीर बागवान, क्रीडा शिक्षक संभाजी चव्हाण, आबाराव गावडे, अविनाश क्षीरसागर, वस्ताद चंद्रकांत काळे, बजरंग सावंत, रशीद शेख, नितीन निळ, विलास तेरवे, बाळासाहेब चवरे, भीमराव मुळे, अण्णा आलदर, शरीफ शेख, कुस्ती समितीचे संस्थापक अध्यक्ष पै अशोक धोत्रे, सचिव पै. अनंत नागनकेरी उपस्थित होते.

14 वर्षांपासून भरविण्यात येणार्‍या या कुस्ती आखड्यासाठी कोल्हापूर, बार्शी, पंढरपूर, इंदापूर, टेभुर्णी, सोलापूर, सांगली, सातारा तसेच परराज्यातून मल्लांनी हजेरी लावली होती. या कुस्तीच्या आखाड्यात लहान मोठ्या अशा 118 कुस्त्या झाल्या. यावेळी कुर्डूवाडी, माळशिरस, पंढरपूर, छत्रपती संभाजी नगर बरोबरच परराज्यातील स्पर्धकांनी बक्षीसे जिंकली. या कुस्त्याच्या स्पर्धा पार पाडण्यासाठी अनंता नागनकेरी, अशोक धोत्रे, तायप्पा गावडे, नवनाथ चवरे, चंद्रराज काळे, सम्राट धोत्रे, हरी वीरपे, अविनाश वाघमोडे, बलभीम आवारे, किरण नागनकेरी, हनुमंत काळे, प्रेम धोत्रे, राजाभाऊ चौधरी, अजबुद्धिन शेख, सचिन काळे आदींसह श्री नागनाथ केसरी कुस्ती समितीच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT