पोखरापूर : मोहोळ रेल्वे स्थानकावर सिद्धेश्वर एक्सप्रेस थांबवण्याचा मुहूर्त ठरला असून येत्या 3 सप्टेंबर रोजी मोहोळ रेल्वे स्थानकावर सोलापूरहून मुंबईकडे व मुंबईकडून सोलापूरकडे निघणार्या सिद्धेश्वर एक्सप्रेस या गाडीला थांबा मिळाला आहे. राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांच्यासह इतर अनेक संघटना व पक्षाने केलेल्या मागणीला यश आले आहे. यामुळे मोहोळ शहरासह तालुक्यातील नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
कोरोना काळापासून मोहोळ रेल्वे स्थानकावर रेल्वे थांबणे बंद झाल्या होत्या. तेव्हापासून अद्यापपर्यंत सोलापूर -पुणे पॅसेंजर वगळता रेल्वे थांबत नव्हत्या . त्यामुळे मोहोळ शहरासह तालुक्यातून पुणे मुंबईकडे जाणार्या प्रवाशांची गैरसोय सुरू होती. पूर्वीप्रमाणे थांबा मिळावा अशी मागणी सातत्याने मोहोळ शहर व तालुक्यातील नागरिकांमधून केली जात होती. 1 सप्टेंबर रोजी रेल्वे प्रशासनाने विविध रेल्वे स्थानकांवर नव्याने थांबणार्या रेल्वे गाड्यांची यादी जाहीर केली. त्यामध्ये सिद्धेश्वर एक्स्प्रेसला मोहोळ स्थानकावर थांबा मिळाला आहे.
मोहोळ शहर व तालुक्यातील विविध सामाजिक संस्था राजकीय पक्षाचे पदाधिकारी यांनी खासदार, आमदार, मंत्री तसेच रेल्वेच्या वरिष्ठ अधिकार्यांना निवेदने देत मोहोळच्या रेल्वे संदर्भाचा प्रश्न मांडला होता. यात आंदोलनेही झाली; मात्र थांब्याचा प्रश्न मार्गी लागेना. राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी सर्वप्रथम केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यापर्यंतही हा विषय मांडला. रेल्वेमंत्री वैष्णव यांनी यांनी आश्वासित केले होते. त्यानुसार 12115 व 12116 या सिद्धेश्वर एक्सप्रेस गाडीला मोहोळ स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. रेल्वे थांब्याच्या गावांच्या यादीत मोहोळचे नाव आल्यामुळे मोहोळ शहर व परिसरातील व्यापारी तसेच सर्वसामान्य नागरिक, वकील, शासकीय कर्मचारी यांच्यामधून समाधान व्यक्त केले जात आहे.
यांच्या पाठपुराव्याला आले यश...
राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक, माजी खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी, खासदार प्रणिती शिंदे, जिल्हा प्रवासी संघटना, मोहोळ शहरातील व्यापारी, वकील संघटना, विविध राजकीय पक्ष, संघटना, भाजपा, राष्ट्रवादी, कॉग्रेस, शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते यांनी सातत्याने या संदर्भात पाठपुरावा केला.सातत्याने मागणी, अनेक आंदोलने उपोषणे झाल्यानंतर अखेर रेल्वे प्रशासनाने तीन तारखेला पुन्हा एकदा सिद्धेश्वर एक्सप्रेसचा मोहोळ रेल्वे स्थानकावर श्री गणेशा करण्याचा मुहूर्त ठरवला.
मोहोळ शहरासह तालुक्यातील भाजपा पदाधिकारी, वकील संघटना, चेंबर ऑफ कॉमर्स यांच्यासह विविध संघटना व विविध पक्षांच्या पदाधिकार्यांनी केलेल्या विनंतीनुसार केंद्रीय मंत्री अश्विन वैष्णव यांच्याशी चर्चा करून निवेदन दिले होते. आज सिद्धेश्वर एक्सप्रेस ला थांबा मिळाला ही खूप मोठी आनंदाची बाब आहे. येणार्या काळात पूर्वी ज्या- ज्या गाड्या थांबत होत्या त्यांना थांबा घेण्यासाठी प्रयत्न करणार आहे.-खा. धनंजय महाडिक, केंद्रीय सदस्य रेल्वे सल्लागार समिती