सोलापूर : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांच्यासह अनेक शिवसेना शिंदे गटाचे नेते आज सोलापूर दौर्यावर आहेत. काँग्रेसचे माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्यासाठी अक्कलकोट येथील मंगरुळे हायस्कूलजवळील मैदानावर जाहीर मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
शिंदे यांचा दौरा दुपारी बारा वाजता नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथे हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्याचा लोकार्पण सोहळा करून शिंदे दुपारी सव्वा दोन वाजता सोलापूर विमानतळावर येणार आहेत. तेथून हेलिकॉप्टरने अक्कलकोटला जातील. दुपारी पावणे तीन वाजता माजी गृहराज्यमंत्री म्हेत्रे यांच्या शिवसेना पक्षप्रवेशानिमित्त आयोजित जाहीर मेळाव्यात ते मार्गदर्शन करतील. त्यानंतर पावणे पाच वाजता हेलिकॉप्टरने सोलापूरला येऊन तेथून मुंबईकडे रवाना होतील.
उपसभापती नीलम गोरे आज सकाळी साडेनऊ वाजता शासकीय विश्रामगृहात आषाढी वारीसंदर्भात प्राथमिक बैठक घेणार आहेत. या बैठकीत जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक, महापालिका आयुक्त, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पंढरपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी उपस्थित राहणार आहेत. दुपारी साडेबारा वाजता त्या अक्कलकोटकडे जातील आणि पावणेदोन वाजता म्हेत्रे यांच्या पक्षप्रवेशाच्या मेळाव्यात सहभागी होतील. त्यानंतर साडेचार वाजता छत्रपती संभाजीनगरकडे प्रस्थान करतील.