बार्शी : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या २२ व्या युवा महोत्सवात बार्शीच्या श्री शिवाजी महाविद्यालयाने आपल्या सांस्कृतिक व कलात्मक वर्चस्वाची परंपरा कायम राखत ११५ गुणांसह सर्वसाधारण विजेतेपदाचा मान पटकावला. सोलापूरच्या संगमेश्वर कॉलेजने ८९ गुणांसह द्वितीय, तर पंढरपूरच्या कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाने ६० गुणांसह तृतीय क्रमांक मिळविला.
शिवाजी महाविद्यालयाने आतापर्यंत तब्बल १७ वेळा युवा महोत्सवाचे सर्वसाधारण विजेतेपद पटकावले आहे. बार्शी येथील श्री शिवाजी महाविद्यालयाच्या परिसरात विद्यापीठाचा यंदाचा २२ वा युवा महोत्सव मोठ्या उत्साहात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात पार पडला. गुरुवारी झालेल्या दिमाखदार समारोप व पारितोषिक वितरण समारंभात विजेत्या महाविद्यालयांची घोषणा करण्यात आली.
अभिनेत्री श्रेया बुगडे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या समारंभाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.डॉ. कर्नल प्रकाश महानवर होते. यावेळी आमदार दिलीप सोपल, प्र-कुलगुरू प्रा. डॉ. लक्ष्मीकांत दामा, प्रभारी कुलसचिव डॉ. अतुल लकडे, श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. बी. वाय. यादव, उपाध्यक्ष नंदन जगदाळे, सचिव प्रकाश पाटील, सहसचिव अरुण देबडवार, खजिनदार जयकुमार शितोळे, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजाभाऊ सरवदे, प्रा. देवानंद चिलवंत, प्रा. सचिन गायकवाड, डॉ. प्रभाकर कोळेकर तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. बी. शेख यांची प्रमुख उपस्थिती होती. विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. केदारनाथ काळवणे यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. विविध विभागांतील विजेत्यांची घोषणा व पारितोषिकांचे वाचन डॉ. यशपाल खेडकर यांनी केले.