सातारा

Shivendraraje Bhosale | जंगल शांत आहे म्हणून वाघ नाही, असे समजू नका; डिवचाल तर भारी पडेल : ना. शिवेंद्रराजे

उगाच डिवचण्याचे, काटक्या घालण्याचे काम करू नका; ते तुम्हाला परवडणारे नाही, असा घणाघाती इशारा

पुढारी वृत्तसेवा

मेढा : जावलीच्या राजकारणात शांतता दिसत असली तरी ती कमजोरी समजण्याची चूक करू नका. जंगलात फिरताना जंगल शांत आहे म्हणून वाघ नाही, असे समजू नका; वाघ झोपलेला असू शकतो. जरा जपून राहा. उगाच डिवचण्याचे, काटक्या घालण्याचे काम करू नका; ते तुम्हाला परवडणारे नाही, असा घणाघाती इशारा सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी विरोधकांना दिला.

मेढ्यात ना. शिवेंद्राजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली महादही हंडीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी जेष्ठ नेते वसंतराव मानकुमरे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे, सभापती सौरभ शिंदे, उपसभापती गोरख महाडीक, नगराध्यक्षा रूपाली वारागडे, उपनगराध्यक्ष विकास देशपांडे, शिवाजीराव देशमुख, पांडूरंग जवळ, दत्तात्रय पवार, नगरसेवक शिवाजी गोरे, अभिनेत्री राजेश्वरी खरात, आदी मान्यवर उपस्थित होते.

ना. शिवेंद्रराजे म्हणाले, ‘कुणीही बाहेरचा येऊन आम्हाला शिकवण्याचा प्रयत्न केला, तर त्याला त्याची जागा दाखवण्याची ताकद आमच्यात आहे. संयमाला कमजोरी समजू नका, एका निवडणुकीत थोडं वर खाली झाले म्हणून फार मोठे मैदान मारले असे समजू नका. घोडे मैदान दुर नाही. तुम्ही दोन हात केले तर आम्ही चार हात करू, असा स्पष्ट इशाराच दिला. राजकारणात मतभेद असू शकतात; मात्र अनावश्यक कुरघोड्या, वैयक्तिक आरोप अथवा जाणीवपूर्वक वातावरण तापवण्याचे खपवून घेतले जाणार नाही.

निवडणुका जवळ आल्या की जावलीचा अचानक कळवळा काहींना येतो. जावलीतील जनतेशी आपले जुने नाते असून, तालुक्याच्या राजकारणात बाहेरून येऊन हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना जनता स्वीकारणार नाही.

डरकाळीने राजकीय वातावरण तापले

सध्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून जावलीत राजकीय वातावरण चांगलेच तापले असताना शिवेंद्रराजेंनी दिलेल्या या इशाऱ्यामुळे वातावरण अधिकच गरमागरम झाले आहे. शिवेंद्रराजेंच्या वक्तव्यातून आगामी काळात जावळीतील राजकीय संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT