सोलापूर : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतील सहा खासदारांनी पक्षाचा आदेश धुडकावून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करत पक्षाची गद्दारी केल्याचा आरोप करत येथील गणपती घाटावर फुटीर खासदारांचा प्रतिकात्मक तेरावा घालून ठाकरे शिवसेनेच्या शिवसैनिकांनी निषेध व्यक्त केला.
धाराशिवचे खा. ओमराजे निंबाळकर यांच्या निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यातील शिवसैनिकांनी बार्शी भागात उन्हातान्हात, स्वखर्चाने प्रचार केला होता. त्यामुळे सोलापुरातील शिवसैनिकांमध्ये खा. निंबाळकरांविषयी प्रचंड रोष दिसून आला.
सोलापूर शहर शिवसेनेने जिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण, महानगर प्रमुख महेश धाराशिवकर यांच्या नेतृत्वाखाली गणपती घाट येथे उष्टे, खरकटे ठेवून या फुटीर खासदारांचा तेरावा घालण्याचे अनोखे आंदोलन करण्यात आले. यावेळी विष्णू कारमपुरी, सुरेश जगताप, संताजी भोळे, बंटी बेळमकर, राजू कुसेकर, विशाल सुरेगावकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.