करमाळा : शिवसेना शिंदे गटाचे सोलापूर जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्यावर करमाळा तालुक्यातील हिवरवाडी गावात शनिवारी (दि. 4) सकाळी प्राणघातक हल्ला झाला. चिवटे यांच्यावर करमाळा शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले. या हल्यामागे भाजपा महिला प्रदेश उपाध्यक्ष रश्मी बागल, शिंदे शिवसेनेचे नेते दिग्विजय बागल यांचा हात असल्याचा गंभीर आरोप चिवटेंनी केला.
महेश चिवटे हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वीय सहायक मंगेश चिवटे यांचे बंधू आहेत. दरम्यान, हल्ल्याची माहिती मिळताच, पोलिस निरीक्षक रणजित माने हे घटनास्थळी धाव घेतली. दिग्विजय बागल हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे विधानसभा निवडणुकीत करमाळा मतदारसंघातील उमेदवार होते. जिल्हाप्रमुख महेश चिवटे यावेळेस प्रचारात आघाडीवर होते. निवडणुकीनंतर दोघांमध्ये अंतर्गत वाद सुरू झाले. पक्षाच्या संघटनात्मक बैठकीत चिवटे व बागल यांच्यात जोरदार खडाजंगी झाली होती.
दिग्विजय बागलांनी आरोप फेटाळले
हल्ल्याच्या आरोपाबाबत दिग्विजय बागल म्हणाले की, या हल्ल्याची मला किंवा रश्मीदीदींना माहिती नाही. महेश यांचे बंधू मंगेश चिवटे यांनी सकाळी फोन केल्यावर हल्ल्याबाबत कळाले. माझ्या भावावर हल्ला करणारी माणसं तुमची आहेत का, असे मंगेश यांनी विचारले. हल्लेखोरांशी माझा कसलाही संबंध नाही. उलट जिल्हाप्रमुख महेश चिवटे हेच माझ्यावर खोट्या केसेस करत आहेत. मी पक्षाचा कार्यकर्ता आहे. पक्षातच राहाणार. पोलिसांनी गरज पडल्यास माझे कॉल रेकॉर्ड तपासावेत, सीडीआर काढावेत. खोटे गुन्हे दाखल करून बदनामी करू नका, असे बागल यांनी सांगितले.
व्हिडीओ शूट करून मारहाण
नुकतेच पूरग्रस्त भागाची पाहणी करताना दिग्विजय बागल यांनी, मला बघून घेतो, म्हणून धमकी दिल्याची तक्रार महेश चिवटे यांनी पोलिसात दिली. हल्लेखोराने त्याच्या मोबाईलमध्ये व्हिडीओ सुरू करून, ‘तू खूप मोठा नेता लागून गेला आहे का, तू रश्मी व दिग्विजय बागल यांची माफी माग. ही शेवटची वॉर्निंग आहे’, अशी धमकी दिल्याचे चिवटे यांनी सांगितले.