सोलापूर : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून तब्बल 17 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याची घटना सोलापूर शहरात घडली. याबाबत दीपक प्रल्हाद मेघाचे (रा. सिद्धार्थ चौक, न्यू बुधवार पेठ, सोलापूर) यांनी फिर्याद दिली आहे.
दीपक मेघाचे यांच्या ओळखीच्या असलेल्या सोमनाथ रमेश स्वामी (रा. शेळगी, सोलापूर) यांनी शेअर मार्केटमध्ये जादा परताव्याचे आमिष दाखवले. दीपक व त्यांच्या ओळखीच्या इसमांकडून स्वामी याने 2024-25 दरम्यान 17 लाख रुपये घेतले. शेअर मार्केटमध्ये जादा परतावा मिळतो, त्यात पैसे गुंतवा असे सांगितल्याने अनेकांनी दीपक यांच्या मार्फत पैसे दिले.
पहिल्यांदा त्याचा परतावा म्हणून सहा लाख 94 हजार रुपये दिले. परंतु नंतर पैसे देण्यास तो टाळाटाळ करु लागला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच दीपक मेघाचे यांनी जोडभावी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार सोमनाथ स्वामी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. हा गुन्हा आर्थिक शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.