श्री तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाला ३ ऑक्‍टोबरपासून प्रारंभ File Photo
सोलापूर

Navratri Festival : श्री तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाला ३ ऑक्‍टोबरपासून प्रारंभ

पुढारी वृत्तसेवा

तुळजापूर : पुढारी वृत्तसेवा

महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाला ३ ऑक्‍टोबरपासून सुरुवात होत आहे. नऊ दिवसांच्या या देवीच्या उत्सवामध्ये गुरुवार दुपारी १२ वाजता विधिवत घटस्थापना होईल आणि नवरात्रीच्या धार्मिक उत्सवाला सुरुवात होईल. (Navratri Festival)

तुळजापूर येथे तुळजाभवानी देवीच्या मंदिरामध्ये पुढील नऊ दिवस देवीचे वेगवेगळे उत्सव संपन्न होतात. महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश अशा विविध राज्यांमधून भाविक भक्तांची खूप मोठी गर्दी तुळजापुरात असते. एक ऑक्टोबर पासून घाटशिरस रोड येथे असणाऱ्या वाहन तळामधून भाविकांच्या दर्शन रांगांना सुरुवात करण्यात आली आहे. येथे धर्मदर्शन मुखदर्शन व सशुल्क दर्शन अभिषेक पूजेची रांग अशा वेगवेगळ्या रांगा केला आहे. भाविकांची सुरक्षितता व मंदिरातील शिस्त लक्षात घेऊन सर्व पातळीवर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

दुपारी बारा वाजता नवरात्राचे यजमान जिल्हाधिकारी श्री व सौ सचिन ओंबासे यांच्या हस्ते दुपारी बारा वाजता सिंह गाभाऱ्यात घटस्थापनेचा विधी संपन्न होईल. ४ ऑक्टोबर रोजी देवीची नित्य उपचार पूजा आणि भाविकांना दर्शन खुले राहील. ५ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री १ वाजता चरण तीर्थ होणार असून सुमारे २० तास तुळजाभवानी देवीचे दर्शन भाविकांना घेता येणार आहे.

६ ऑक्टोबर रोजी देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मध्यरात्रीपासून दर्शन दिले जाईल. रात्री १० वा. छबिना संपन्न होईल. नवरात्रातील विशेष पूजा सुरू होतील. या दिवशी देवीला रथ अलंकार महापूजा केली जाईल. रात्री १० वाजता छबिना संपन्न होईल. ८ ऑक्टोबर रोजी सकाळचे अभिषेक संपल्यानंतर देवीसमोर मुरली अलंकार महापूजा मांडली जाईल. या दिवशी संपन्न होणारा छबिना रात्री १० वाजता निघेल.

९ ऑक्टोबर रोजी शेषशाही महालंकार महापूजा संपन्न होईल, दिवसभर भाविकांचे दर्शन खुले राहील. या दिवशी रात्री १० छबिना संपन्न होईल. छत्रपती शिवाजी महाराज यांना तुळजाभवानी देवीने भवानी तलवार दिली हा ऐतिहासिक देखावा देवीच्या समोर 10 ऑक्टोबर रोजी मांडला जाईल. ११ ऑक्टोबर रोजी महिषासुरमर्दिनी हा अत्यंत जाज्वल्य देखावा देवीच्या चांदीच्या सिंहासनावर बांधला जातो. याचे दर्शन घेण्यासाठी लाखो भाविकांची गर्दी असते. रात्री १० वाजता छबीना निघेल. या दिवशी वैदिक होमाला सुरुवात होईल. १२ ऑक्टोबर रोजी होमकुंडावरील धार्मिक विधी झाल्यानंतर घट उठवले जाईल.

नगर जिल्ह्यातील भिंगार येथून येणारी पलंग पालखी याच दिवशी मध्यरात्री २.३० वाजता तुळजाभवानी देवीच्या मंदिरात येणार आहे. याच दिवशी पहाटे ५.३० वाजता देवीचे ऐतिहासिक सिमोलंघण होईल, यावर्षी प्रशासनाच्या वतीने कुंकवाच्या उजळण करण्याच्या ऐवजी फुलांचा उपयोग करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सचिन ओबासे यांनी केले आहे. १६ ऑक्टोबर ही कोजागिरी पौर्णिमेची तारीख आहे. १४ ते १६ या तीन दिवशी लाखो भाविकांची गर्दी तुळजापुरात असते. या काळात पायी कर्नाटक आणि पश्चिम महाराष्ट्र या भागातून लोक दर्शनासाठी येतात.

१७ ऑक्टोबर ही मंदिराची पौर्णिमा आहे. तुळजाभवानी देवीचे सीमोल्लंघन झाल्यानंतर घेण्यात आलेली श्रम निद्रा या दिवशी पूर्ण होते व देवीची मूर्ती पुन्हा चांदीच्या मुख्य सिंहासनावर प्रतिष्ठापित करण्यात येते. या दिवशी सोलापूर येथील शिवलाड तेली समाजाच्या काठा देवीच्या छबिनेसाठी दाखल होतात. सलग ३ दिवस देवीचा छबीला निघतो आणि शारदीय नवरात्र महोत्सव व पौर्णिमा हा धार्मिक कार्यक्रम पूर्ण होतो.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT