सोलापूर : आगामी स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत मुंबईत बैठक झाली. या बैठकीत सोलापुरातील पदाधिकाऱ्यांना महापालिकेतून भाजपला हद्दपार करण्यासाठी समविचारी पक्षाची आघाडी करण्याचे आदेश दिले आहेत.
स्थानिक पातळीवर कोणताही निर्णय घ्या. प्रदेश पातळीवरून आपल्यास सहकार्य मिळेल. सोलापूर जिल्ह्याचे प्रभारी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या समवेत समन्वय ठेऊन निर्णय घेण्याचे आदेश दिले असल्याची माहिती माजी महापौर यु.एन. बेरिया यांनी दिली.
मुंबई झालेल्या बैठकीस राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, खासदार धैर्यशील मोहिते-पाटील, सोलापूर जिल्ह्याचे प्रभारी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार एकनाथ खडसे, माजी मंत्री बाळासाहेब पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड, जिल्हाध्यक्ष वसंत नाना देशमुख, जिल्हा कार्याध्यक्ष रवि पाटील तर सोलापूर माढ्याचे आमदार अभिजित पाटील तसेच सोलापूर शहरातून माजी महापौर यु. एन. बेरिया, माजी शहराध्यक्ष महेश गादेकर, भारत जाधव आदी उपस्थित होते. बैठकीला पक्षाच्या तीन आमदारांनी दांडी मारल्याचे दिसून आले. पश्चिम भागातील सोलापूर महानगरपालिका महत्त्वाची आहे.
शहरातील राजकीय परिस्थतीचा आढवा शरद पवार यांनी घेतला. बेरीया यांनी महापालिकेत 2017 मध्ये असलेली परिस्थिती. पक्षाच्या पराभवाची झालेली कारणे आणि 2025 मध्ये आगामी निवडणुकीसाठी कोणत्या उपाय योजना करावी लागणार यांची माहिती दिली. तर महाविकास आघाडीसमवेत जागा वाटप करताना ज्यांची ज्या भागात ताकत आहे, त्यानुसार जागा वाटप करण्याचे मुद्दे मांडले. त्यावर शरद पवार यांनी सोलापूर महानगरपालिकेत भाजप हद्दपार करण्यासाठी शहरातील इतर समविचारी पक्षाशी आघाडी करा, असे आदेश दिले.