पंढरपूर : केंद्राच्या राजकारणामध्ये येत्या 15 दिवसांत बदल झाल्याचे दिसून येतील. इंडिया आघाडीत फूट पडेल, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार हे भाजपचे हस्तक असल्याचा घणाघाती आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला.
कोरोना काळात नियमबाह्यपणे आंदोलन करत जमाव जमवल्याबद्दल पंढरपूर न्यायालयाने अॅड. आंबेडकर यांना समन्स बजावले होते. त्यासंदर्भात ते येथील न्यायालयात आले होते. त्यानंतर आंबेडकर पत्रकारांशी बोलत होते. ट्रम्प सरकारने भारतावर सुमारे 70 टक्के टॅरिफ लावला. रशियाकडून भारत तेल खरेदी करतो, त्यामुळे हा टॅरिफ लागलाआहे. विशेष म्हणजे रशियाही आपल्या विरोधात आहे. आपल्या शेजारचे देश विरोधात आहेत. ‘सिंदूर ऑपरेशन’ आणखी चार दिवस चालले असते तर पाकिस्तानचे पाच तुकडे झाले असते. मात्र, ते राबवले गेले नाही, असेही आंबेडकर म्हणाले.
देशाला आर्थिक दिवाळखोरीत जाण्यापासून वाचचिवण्यासाठी राहुल गांधी यांच्या नेतृत्वाची गरज आहे काय, असे विचारले असता, आंबेडकर म्हणाले की, कुण्या एका नेतृत्वाची गरज नाही तर सर्वसामान्य जनतेने मनावर घेऊन भाजपची सत्ता देशावर येणार नाही, याची खबरदारी घेण्याची खूणगाठ जनतेनेच बांधायला हवी. देशात देवाच्या नावाने राजकारण सुरू झालेले आहे. याला जनतेने आळा घालावा, असे मत आंबेडकर यांनी व्यक्त केले. मंत्री रामदास आठवले हे भाजपचे मंत्री आहेत, रिपब्लिकन पार्टीचे मंत्री नाहीत, असा टोलाही त्यांनी लगावला.
आंबेडकर म्हणाले की, कोरोना काळात विठ्ठल रुक्मिणी मंदिर बंद होते. ते उघडण्यात यावे यासाठी आंदोलन केले. कोरोना संपत आल्यानंतर सर्व बाजारपेठा सुरू झाल्या होत्या; मात्र राज्यातील मंदिरे सुरू करण्यात आली नव्हती. यामुळे मंदिराचे दरवाजे उघडावेत, अशी मागणी भाविकांतून होत होती. मात्र याकडे प्रशासन व शासन दुर्लक्ष करत होते. म्हणून आपण राज्यात विविध तीन ठिकाणी मंदिरासाठी आंदोलन केले. मात्र पंढरपुरात आंदोलन केल्यामुळे न्यायालयाकडून समन्स बजावण्यात आले आहे. आपण न्यायालयाचा आदर करून उपस्थित राहिलो.
विरोधी पक्षाला लकवा ...
अमेरिकेने भारतावर 50 ते 70 टक्के टॅरिफ लावल्यामुळे मोदी सरकार आर्थिक दिवाळीखोरीच्या उंबरठ्यावर आले. लवकरच देशाची आर्थिक शिस्त बिघडणार आहे. विरोधी पक्षाला लकवा भरला आहे. त्यामुळे परदेशी नेत्यांनी भारताला घेरले आहे. भारताला यापासून वाचवायचे असेल तर भाजपला सत्तेवर येण्यापासून जनतेने रोखले पाहिजे, अशी आवाहन अॅड. आंबेडकर यांनी केले.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी मनोज जरंगे तर ओबीसींना आरक्षण मिळावे यासाठी लक्ष्मण हाके आंदोलन करत आहेत. मात्र, त्यांना समाजाशी काही देणे घेणे नाही. त्यांना मास लीडर व्हायचे आहे- अॅड. प्रकाश आंबेडकर