सांगोला : सांगोला तालुक्यातून जाणान्या नागपूर ते गोवा शक्तिपीठ महामार्गातील 15 गावांतील 792 गटाच्या मोजणीची कार्यवाही 16 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबरपर्यंत करण्यात येणार असून ज्या गटाचा शेतकरी आहे त्यास यावेळी हजर राहता येणार असून पाच किंवा त्याहून जास्तजण एकत्र येऊन बेकायदेशीर जमाव जमल्यास कलम 223 प्रमाणे शिक्षेस पात्र राहतील, असा आदेश उपविभागीयदंडाधिकारी बी. आर. माळी यांनी काढला आहे.
दि. 16 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबर या कालावधीत पंधरा गावातील 792 गटांच्या मोजणीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या दरम्यान एकतपूर, बलवडी, पाचेगाव, कोंबडवाडी, बंडगरवाडी, चोपडी, मांजरी, मेढवडे, चिंचोली, यलमार मंगेवाडी, नाझरे या गावातील सुमारे 792 गटांची टप्प्या टप्याने मोजणी करण्यात येणार आहे. त्या गावातील गटाची मोजणी करीत असताना बेकायदेशीर जमाव जमविणे, मोजणी करण्यास अडथळा आणणे, शासकीय यंत्रणेचे अधिकारी कर्मचारी यांना विरोध करणे, पाच किंवा त्याहून जास्त लोक एकत्र येणे यास मनाई करण्यात आली आहे.
तसेच गावाची मोजणी ज्या दिवशी होणार आहे त्या गावातील त्या गटाचे शेतकरी, हितसंबंधित व्यक्ती खेरीज इतर इसमांना 12 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबर अखेर उपस्थित राहता येणार नाही. सदर आदेशाचा भंग केल्यास 223 प्रमाणे शिक्षेस पात्र राहील, असा आदेश उपविभागीय अधिकारी यांनी काढला आहे.
असा असणार मोजणीचा कार्यक्रम
पंधरा गावांतील 792 गटांच्या मोजणीचा कार्यक्रम जाहीर केला असून तो पुढीलप्रमाणे असून 16 सप्टेंबर रोजी चिनके 77 गट, 18 सप्टेंबर रोजी एकतपूर 34 गट, बलवडी तीन व वारे 29 गट, 23 रोजी पाचेगाव 96, 30 रोजी कोंबडवाडी 21 गट तर ऑक्टोबरमध्ये बंडगरवाडी (चोपडी) नऊ गट, सोमेवाडी आठ, चोपडी 98, मांजरी 85, मेथवडे 63, चिंचोली 131, यलमार मंगेवाडी 44 व नाझरे 50 गटांची मोजणी होणार आहे.