तुळजापूर : महाराष्ट्राची कुलस्वामिनी तथा शक्तिदेवता श्री तुळजाभवानी मातेच्या शाकंभरी नवरात्र महोत्सवास मंगळवार, 7 जानेवारीपासून प्रारंभ होत आहे. या निमित्ताने देवीच्या मंचकी निद्रेस मंगळवारी (31 डिसेंबर) प्रारंभ होणार आहे. यादिवशी मातेच्या सायंकाळच्या पंचामृत अभिषेक नित्योपचार पूजेनंतर देवीची मंचकी निद्रा प्रारंभ होईल.
मंगळवार 7 जानेवारी 25 (पौष शुद्ध अष्टमी) रोजी पहाटे मातेची मुख्य मूर्ती सिंहासनावर आरूढ होऊन पंचामृत अभिषेक नित्योपचार पूजा पार पडून दुपारी बारा वाजता मंदिरातील गणेश विहार ओवरीत विधिवत घटस्थापना केली जाणार आहे. त्यानंतर नवरात्र महोत्सवाच्या काळात स्थानिक ब्रह्मवृंदास अनुष्ठानाची वर्णी दिली जाणार आहे.
8 जानेवारी रोजी देवीच्या नित्योपचार पूजेनंतर दुपारी रथ अलंकार महापूजा व रात्री छबिना, गुरुवार 9 जानेवारी रोजी नित्योपचार पूजेनंतर मुरली अलंकार महापूजा मांडली जाते. रात्री छबिना, 10 जानेवारी सकाळी मातेच्या नित्योपचार पूजेनंतर शेषशाही अलंकार महापूजा व रात्री छबिना, शनिवारी 11 जानेवारी रोजी सकाळी 7 वाजता जलयात्रा व दुपारी भवानी तलवार अलंकार महापूजा व रात्री छबिना, रविवारी 12 जानेवारी सकाळी मातेच्या नित्योपचार पूजेनंतर अग्निस्थापना, शतचंडी होमहवनास सुरुवात होत असून मातेची महिषासुर मर्दिनी अलंकार महापूजा बांधण्यात येणार आहे. रात्री छबीना मिरवणूक काढण्यात येणार आहे. पौष शुद्ध पौर्णिमा सोमवारी 13 जानेवारीला असून सकाळी देवीची नित्योपचार पूजा व दुपारी बारा वाजता शतचंडी होमास पूर्णाहुती देऊन, घटोत्थापनाने सांगता आणि रात्री मातेची छबिना मिरवणूक निघणार आहे. मंगळवारी 14 जानेवारी रोजी सकाळी देवीची नित्योपचार पूजा पार पडून दुपारी अन्नदान (महाप्रसाद), रात्री मातेच्या छबीना मिरवणुकीनंतर शाकंभरी नवरात्र महोत्सवाची सांगता होणार आहे.