पंढरपूर : आरोग्य विभागाच्या आढावा बैठकीत मार्गदर्शन करताना मंत्री प्रकाश आबिटकर. याप्रसंगी आ. समाधान आवताडे, आ. राजू खरे, कुलदीप जंगम, सचिन इथापे आदी. Pudhari Photo
सोलापूर

Pandharpur News | वारकर्‍यांची सेवा हीच पांडुरंगाची सेवा समजून काम करावे : मंत्री प्रकाश आबिटकर

पालखी सोहळ्यानंतरही संबंधित ठिकाणची स्वच्छता, फवारणी व आरोग्य सुविधा देण्यात येणार

पुढारी वृत्तसेवा

पंढरपूर : आषाढी यात्रा सोहळ्यासाठी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी व जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी तसेच अन्य संतांच्या पालखी सोहळ्यासोबत मोठ्या प्रमाणात वारकरी भाविक सहभागी होतात. सर्व वारकरी भाविकांना पालखी मार्ग, विसावा तसेच पालखी तळांवर आवश्यक आरोग्य सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यास प्राधान्य द्यावे. वारकर्‍यांची आरोग्य सेवा करणे ही मोठी भाग्याची गोष्ट आहे. वारकरी सेवा हीच पांडुरंगाची सेवा समजून प्रत्येकाने सेवाभावाच्या भावनेने कर्तव्य पार पाडावे, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले.

पंढरपूर येथे आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर वारकरी भाविकांना देण्यात येणार्‍या आरोग्य सुविधेबाबतचा आढावा घेतला आणि वाखरी पालखी तळाची पाहणी केली. यावेळी मंत्री आबिटकर बोलत होते. या बैठकीस आ. समाधान आवताडे, आ. राजू खरे, सीईओ कुलदीप जंगम, डॉ. विजय कंदेवार, डॉ. संदीप सांगळे, डॉ. राधाकिशन पवार, सचिन इथापे, डॉ. सुहास माने, डॉ. संतोष नवले, डॉ. श्रीकांत कुलकर्णी, डॉ. महेश सुडके आदी उपस्थित होते.

यावेळी मंत्री आबिटकर म्हणाले की, प्रत्येक वारीत आरोग्य विभागाने चांगले काम केले आहे. या वारीतही आरोग्य विभागाने सूक्ष्म नियोजन करुन वारकरी, भाविकांना अधिकच्या सोयी-सुविधा उपलब्ध कराव्यात. साथरोग नियंत्रणाच्या दृष्टीने पालखी सर्व मार्गावरील पाणी स्त्रोतांचे सर्वेक्षण तसेच पाणी नमुने तपासणी करावी. पालखी मार्गावरील संबंधित गावातून पालखी सोहळे मार्गस्थ झाल्यानंतर त्याठिकाणची स्वच्छता करावी. तत्काळ औषध फवारणी करावी. तसेच स्थानिक नागरिकांना आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्यात याव्यात.

महिला वारकर्‍यांसाठी स्त्रीरोगतज्ज्ञाच्या माध्यमातून विशेष तपासणीचे नियोजन करावे. पंढरपूर शहर त्याचबरोबर पालखी मार्गावरील खासगी दवाखान्यात महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना व प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेअंतर्गत असणार्‍या रुग्णालयांना 10 टक्के खाटा आरक्षित करण्यात येणार आहेत. ट्रॉमा आय.सी.यू. सेंटरच्या ठिकाणी तज्ज्ञ मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. यावेळी आरोग्य विभागाच्यावतीने केलेल्या तयारीबाबतचे सादरीकरण आरोग्य उपसंचालक डॉ. राधाकिशन पवार यांनी केले. यामध्ये पालखी मार्गावर प्रत्येक पाच किलोमीटर अंतरावरती 203 आपला दवाखाना स्थापन करण्यात आले आहेत. पालखी मार्गावरील सर्व आरोग्य संस्थामध्ये पुरेशा औषधसाठा व तज्ज्ञ व प्रशिक्षित मनुष्यबळ यांची उपलब्धता असणार असल्याचे सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT