सोलापूर : दुष्काळग्रस्त म्हणून ओळखल्या जाणार्या परंतु ऊस क्षेत्रात नंबर एकवर असलेल्या सोलापुरात यंदाच्या मोसमातील उच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे. शुक्रवारी (दि. 2) 44.7 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली. तप्त उन्हाच्या झळामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. रस्ते निर्मनुष्य बनले होते.
यंदा एप्रिल महिन्यांपासूनच तापमानात सातत्याने वाढ होत आहे. गेल्या महिनाभरापासून तापमान 40 अंशांपुढेच राहिले आहे. उन्हाळा सोलापूरकरांसाठी त्रासदायक ठरला आहे. गुरुवारी (दि. 1) 44.1 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली होती. सलग दुसर्या दिवशी शुक्रवारी 44.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. हे यंदाच्या मोसमातील उच्चांकी तापमान ठरले.
सध्या लग्नसराई असल्याने विवाह सोहळे, लग्नासाठी बस्ता व अन्य साहित्य खरेदीसाठी नेहमीच सराफ कट्टा, कुंभार वेस, मधला मारुती, विजयपूर रोड, मंगळवार पेठ, विजापूर वेस यासह अन्य बाजारपेठेत नागरिकांची गर्दी असते. परंतु, शुक्रवारी दुपारी वाहणार्या उष्णतेच्या झळांमुळे नागरिकांनी खरेदीसह अन्य कामांसाठी बाहेर न पडता घरातच थांबणे पसंत केले.
त्याने दुपारी रस्ते निर्मनुष्य झाले होते. कलिंगड, चिक्कू यासारख्या फळांचा ज्यूस घेण्याबरोबरच ताक, लस्सी, मठ्ठा पिऊन नागरिकांनी शरीरातील तापमान नियंत्रित ठेवण्याचा प्रयत्न केला.
गुरुवारी 44.1 अंश कमाल तर 27.1 किमान तापमान नोंदले गेले. शुक्रवारी किमान आणि कमाल तापमानात वाढ होत 44.7 अंश कमाल तापमान तर किमान तापमान 30 अंशावर पोचले. वाढत्या तापमानामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.