हंजगी : अक्कलकोट तालुक्यातील हंजगी येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्रीपती कल्लपा बाणेगाव यांनी मॉडर्न हायस्कूल सोलापूर येथे मुख्याध्यापक म्हणून सेवानिवृत्त झाल्यानंतर हंजगी येथे अथक परिश्रम करीत चार एकर तंत्रशुध्द पध्दतीने बांबू लागवड केले होते. सध्या शेतात बांबूची परिपूर्ण वाढ होऊन बांबू शेती फुलली गेली आहे. ही बांबू शेती पाहण्यासाठी अनेक शेतकरी श्रीपती बाणेगाव यांच्या बांबू शेतीला भेट देताना दिसून येत आहेत.
विशेष करून बांबू शेती पाहण्यासाठी श्रीपती बाणेगाव यांच्या शेताला अक्कलकोट कृषी विभागाकडून कृषी सहाय्यक आनंद कांबळे, कृषी सहाय्यक चिदानंद खोबण, रोजगार सहाय्यक मोहसिन मुल्ला आदींनी भेट देऊन श्रीपती बाणेगाव यांच्या बांबू शेतीचे विशेष कौतुक केले. यावेळी श्रीपती बाणेगाव यांनी अनुभव सांगितले. यावेळी तालुका कृषी विभागाचे कृषी सहाय्यक आनंद कांबळे यांनी बांबू शेती कशी फायदेशीर आहे, हे समजून सांगितले.
सोलापूर जिल्ह्याचे वातावरण बांबू शेतीसाठी अतिशय पूरक असे आहे. अनेक शेतकरी बांबू लागवड करून पर्यायी उत्पन्न व पीक पध्दती शोधत आहेत. शासनाच्या अनेक योजनाही आहेत. प्रशिक्षण व विविध मदतीमुळे जिल्ह्यातील शेतकरी बांबू लागवड करत आहेत.