सोलापूर : तंत्रज्ञानाच्या युगात शिक्षणाची व्याप्ती आता केवळ पुस्तकांपुरती मर्यादित राहिलेली नाही. याचाच प्रत्यय सोलापूरच्या शिक्षण क्षेत्रात पाहायला मिळत आहे. येथील नॅब संचलित चंद्रभागाबाई यलगुलवार प्रशाला व ज्युनिअर कॉलेजने निसर्ग आणि तंत्रज्ञान यांचा सुरेख संगम घडवून आणला आहे. शाळेच्या आवारातील झाडांवर क्यूआर कोड लावून, झाडांशी संवाद साधण्याचा एक अभिनव मार्ग या प्रशालेने शोधला असून हा उपक्रम सध्या शहरात चर्चेचा विषय ठरत आहे.
शालेय परिसरातील झाडांविषयीची सखोल माहिती आता प्रत्यक्ष झाडच सांगणार आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. प्राचार्या सीमा श्रीगोंदेकर-यलगुलवार यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम साकारण्यात आला आहे. शाळेच्या आवारात असलेल्या विविध वृक्षांवर विशिष्ट कोड लावण्यात आले आहेत. कोणताही विद्यार्थी, पालक किंवा शाळेला भेट देणारा पाहुणा आपल्या मोबाईलद्वारे हा क्यूआर कोड स्कॅन करताच, त्या झाडाची संपूर्ण माहिती मोबाईल स्क्रीनवर झळकते. हे क्यूआर कोड स्कॅन केल्यावर मिळणारी सर्व माहिती मातृभाषेत उपलब्ध करून देण्यात आली आहे.
हा डिजिटल उपक्रम यशस्वी करण्यासाठी पर्यावरणप्रेमी शिक्षक मुकुंद शेटे यांनी विशेष परिश्रम घेतले आहेत. उपक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी प्राचार्या सीमा श्रीगोंदेकर-यलगुलवार यांच्यासह शाळेतील शिक्षक वृंद आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.