सोलापूर : महाराष्ट्र शासनाने शिष्यवृत्ती प्रक्रियेत महत्त्वपूर्ण सुधारणा केली आहे. ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांच्या कटकटीचा त्रास कायमचा संपणार आहे. यापूर्वी प्रत्येक वर्षी उत्पन्नाचा दाखला आणि इतर आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागायची, ज्यामुळे विद्यार्थ्यांना वारंवार कागदपत्रे तयार करून ठेवावी लागत होती.
आता मात्र, महाडीबीटी पोर्टलवर एकदाच उत्पन्नाचा दाखला आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यावर ती संपूर्ण अभ्यासक्रमासाठी वैध मानली जातील. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष आणि तंत्रशिक्षण संचालनालयाद्वारे व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेतही एकदाच कागदपत्रांची पडताळणी ऑनलाईन आणि ऑफलाईन करून केली जाते. यामुळे शिष्यवृत्ती अर्जासाठी पुन्हा तीच कागदपत्रे मागितली जाणार नाहीत, याची खात्री उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. ही ऑनलाईन व पारदर्शक प्रक्रिया शिष्यवृत्ती अर्ज पाहणीचा वेळ वाचवेल. तसेच शिष्यवृत्ती थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात वेळेवर जमा होईल. प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा डेटाही अचूक उपलब्ध होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा भरपूर वेळ व मेहनत वाचेल आणि ते आपल्या अभ्यासावर अधिक लक्ष केंद्रित करू शकतील.
प्रक्रियेत सुधारणा करण्याचे निर्देश
अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी, ईडब्ल्यूएस, एसईबीसी आणि इतर प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वेळेत मिळावी. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री यांनी शिष्यवृत्ती प्रक्रियेत सुधारणा करण्याचे निर्देश दिले आहेत. जेणेकरून विद्यार्थ्यांना वेळेवर आर्थिक सहाय्य मिळेल.
महाडीबीटी पोर्टलवर एकदाच कागदपत्रे अपलोड
महाडीबीटी पोर्टलवर विद्यार्थ्यांनी एकदाच कागदपत्रे अपलोड करावी लागतील.
वारंवार तीच माहिती देण्याची आवश्यकता राहणार नाही.
विद्यापीठांनाही पुन्हा कागदपत्रे तपासण्याची गरज पडणार नाही.
यामुळे वेळेची बचत होईल आणि विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती लवकर मिळेल.