सोलापूर : पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत मराठी विषयाच्या प्रश्नाला उत्तरासाठी चुकीचे पर्याय देण्यात आले होते. त्या चुकीच्या प्रश्नाचे गुण सरसकट सर्व विद्यार्थ्यांना देण्यात यावेत, अशी मागणी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्तांकडे केल्याची माहिती डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेचे प्रदेश महासचिव सुनील चव्हाण यांनी दिली.
डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद, युवक शिक्षक कर्मचारी संघटना व अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटनेच्या वतीने निवेदनाद्वारे ही मागणी करण्यात आली. 22 फेब्रुवारी रोजी झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत प्रथम भाषा मराठीच्या पेपरमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे पूर्ण नाव काय? असा प्रश्न विचारण्यात आला होता. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे पूर्ण नाव माणिक बंडोजी इंगळे (ठाकूर) असे आहे.
या प्रश्नाच्या उत्तरासाठी नारायण सूर्याजी ठोसर, विनायक जनार्दन करंदीकर, माणिक बंडोजी ब्रम्हभट, माणिक तात्या तळवलकर असे चार पर्याय देण्यात आले होते. बरोबर पर्याय न दिल्यामुळे विद्यार्थी गोंधळून गेले. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या गुणांवर होणार आहे. त्यामुळे पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेतील प्रथम भाषा मराठीतील प्रश्नाला सर्व विद्यार्थ्यांना सरसकट गुण द्यावेत, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या निवेदनावर आप्पाराव इटेकर, विनोद आगलावे व अ. गफुर अरब यांच्या सह्या आहेत.