सोलापूर : पर्यावरण संवर्धनासाठी शेतकर्यांनी रासायनिक खतांचा कमीत कमी वापर करत सेंद्रीय शेतीकडे वळावे. पर्यावरण संवर्धनासाठी मधमाशी वाचवणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन प्राणिशास्त्र अभ्यासक डॉ. सिद्धार्थ तळभंडारे यांनी केले.
सोलापुरातील युगंधर फाऊंडेशन आणि पुण्यातील खादी ग्रामोद्योग आयोगाची केंद्रीय मधमाशी संशोधन प्रशिक्षण संस्था (सीबीआरटीआय) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मधमाशी पालन आणि संवर्धन विषयक एकदिवशीय मोफत कार्यशाळा घेण्यात आली. त्याप्रसंगी डॉ. तळभंडारे बोलत होते. छत्रपती शिवाजी नाईट कॉलेजमध्ये झालेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्राचार्य डॉ. अरुण मित्रगोत्री यांनी भूषविले. यावेळी व्यासपीठावर युगंधर फाऊंडेशनच्या अध्यक्षा प्रा. रेश्मा माने उपस्थित होत्या. या कार्यशाळेसाठी जिल्हाभरातून सुमारे दीडशे विद्यार्थी, नागरिक व प्रतिनिधी उपस्थित होते.
मधमाशी पालन आणि भविष्यातील संधी, मधमाशी संवर्धनासाठी उपाययोजना याविषयी यावेळी तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी छत्रपती शिवाजी कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. युवराज सुरवसे यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युगंधर फाऊंडेशनच्या सुप्रिया माने यांनी केले. आभार राहुल लोंढे यांनी मानले.
मधमाशी पालन, संवर्धनासाठी सोलापूर शहर जिल्ह्यातील जास्तीत जास्त तरुणांनी, सेवाभावी संस्थांनी, शेतकरी गटांनी पुढाकार घ्यावा. मधमाशीच्या जीवनाशी मानवी जीवन निगडीत आहे.- प्रा. रेश्मा माने, अध्यक्षा, युगंधर फाऊंडेशन