New year weather Pudhari
सोलापूर

New year weather: नव्या वर्षात राज्यात पाऊसकाळ समाधानकारक

दाते पंचागानुसार देशाच्या काही भागात नैसर्गिक आपत्ती शक्य

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : गुढी पाडव्यापासून सुरू होणाऱ्या नव्या मराठी वर्षात मे महिन्यात ऋतुउत्तेजक रवि-बुध युतीमुळे मान्सूनपूर्व वळवाचा पाऊस होण्यास पोषक वातावरण होईल. महाराष्ट्रात मान्सूनचे वेळेवर आगमन होईल. महाराष्ट्रात दि. 8 ते 10 जूनच्या सुमारास पावसाचे आगमन होईल. 15 जून ते 12 ऑगस्ट या काळात महाराष्ट्रात समाधानकारक पाऊस होईल, अशी माहिती दाते पंचागात देण्यात आली आहे.

मराठी नववर्षाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे इंग्रजी मार्च तर मराठी चैत्र महिन्यात दि. 19 मार्च रोजी गुढीपाडवा आहे. त्यादिवशी हे पंचाग गेल्या 111 वर्षांपासून प्रसिद्ध होत आहे. या पंचागात हवामान व पर्जन्य विचाराविषयी दिलेल्या माहितीनुसार, दि. 17 ऑगस्ट ते 26 सप्टेंबर या काळात उत्तर भारत, उत्तर महाराष्ट्रात, विदर्भ, मराठवाड्यात मोठी पर्जन्यवृष्टी होईल. ऑक्टोबरमध्ये परतीचा पाऊस मोठ्या प्रमाणावर होईल, दक्षिण भारतामध्येत परतीच्या पावसाने जनजीवन विस्कळीत होईल असेही यामध्य नमूद करण्यात आले आहे. या पर्जन्यविचारासाठी दाते पंचांगकर्त्यांना ज्यो. सिद्धेश्वर मारटकर यांचे सहकार्य लाभल्याचे नमूद आहे.

नक्षत्रनिहाय पर्जन्य विचार

1. मृग : दि. 8 जून 2026 रोजी सूर्य मृग नक्षत्रत प्रवेश करेल. या नक्षत्राचे वाहन बेडूक असून या नक्षत्रात पर्जन्यवृष्टी चांगली होईल. काही ठिकाणी अतिवृष्टीने जनजीवन विस्कळीत होईल.

2. आर्द्रा : दि. 22 जून 2026 रोजी आर्द्रा नक्षत्र सुरू होत आहे. या नक्षत्राचे वाहन गाढव असून या नक्षत्राच्या पूर्वाधात बऱ्यापैकी पाऊस अपेक्षित आहे. उत्तरार्धात मात्र पाऊस ओढ देईल.

3. पुनर्वसू : दि. 6 जुलै 2026 पासून हे नक्षत्र सुरू होत असून या नक्षत्राचे वाहन घोडा आहे. दि. 13 जुलैनंतर या नक्षत्रात पर्जन्याचे प्रमाण चांगले राहील. महिन्याच्या उत्तरार्धात समाधनकारक पाऊस होऊन नद्या, धरणांच्या पाणीपातळीत वाढ होईल.

4. पुष्य : दि. 20 जुलै 2026 रोजी हे नक्षत्र सुरू होत असून याचे वाहन उंदीर आहे. याकाळात सर्वत्र चांगला पाऊस होईल. काही ठिकाणी अतिवृष्टी होऊ शकते.

6. अश्लेषा : दि. 3 ऑगस्ट 2026 पासून हे नक्षत्र सुरू होत आहे. याचे वाहन हत्ती आहे. या नक्षत्रात समाधानकारक पाऊस होईल.

7. मघा : दि. 17 ऑगस्ट 2026 रोजी मघा नक्षत्र सुरू होईल. याच वाहन मोर असेल. या काळात पाऊस खंडीत होईल, मात्र काही भागात पावसाचे प्रमाण दमदार राहील. या काळात नैसर्गिक आपत्ती संभवते. उत्तर भारत, मराठवाडा, विदर्भ, सोलापूर या भागात मोठ्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत होईल.

8. पूर्वा : दि. 30 ऑगस्ट 2026 रोजी हे नक्षत्र सुरू होत आहे. या नक्षत्राचे वाहन गाढव असून या नक्षात दक्षिण महाराष्ट्रात बऱ्यापैकी पाऊस होईल.

9. उत्तरा : दि. 13 सप्टेंबर 2026 रोजी हे नक्षत्र सुरू होत आहे. याचे वाहन बेडूक असून या काळात उष्णतामान वाढेल. पाऊसही बऱ्यापैकी होईल. उत्तर भारत, मराठवाडा, सोलापूर या भागात पावसाने जनजीवन विस्कळीत होईल.

10. हस्त : दि. 27 सप्टेंबर 2026 रोजी हस्त नक्षत्र सुरू होत आहे. याचे वाहन उंदीर आहे. या काळात पाऊस खंडित होईल, मात्र काही भागात हस्ताच्या मोठ्या सरी होतील.

11. चित्रा : दि. 10 ऑक्टोबर 2026 रोजी या नक्षत्राची सुरूवात होईल. याचे वाहन घोडा आहे. मागील नक्षत्रापेक्षा या नक्षत्रात पाऊसमान थोडेफार सुधारलेले असेल. मात्र समाधानकारक पाऊस नसेल.

12. स्वाती : दि. 24 ऑक्टोबर 2026 रोजी या पावसाच्या शेवटच्या नक्षत्राचा आरंभ होईल. याचे वाहन बेडूक असून या काळात पर्जन्यवृष्टीचे योग आहेत. काही भागात अतिवृष्टीमुळे पाऊस होण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT