करकंब : शक्तिपीठ महामार्ग झाला तर बाधित शेतकऱ्यांच्या घरात दिवाळी-दसऱ्याऐवजी कायम शिमगाच साजरा होत राहील. त्यामुळे ही शेतकऱ्यांच्या अस्तित्वाची लढाई असून या लढ्यात आम्ही तुमची ढाल बनून शेवटपर्यंत लढत राहू, असा विश्वास विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते व आमदार सतेज पाटील यांनी बाधित शेतकऱ्यांना दिला.
करकंब येथे आयोजित शक्तिपीठ महामार्ग विरोधी सर्वपक्षीय शेतकरी एल्गार मेळाव्या प्रसंगी बोलत होते. यावेळी शेतकरी नेते राजू शेट्टी, खासदार धैर्यशील मोहिते-पाटील, शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीचे राज्य समन्वयक गिरीश फोंडे, मारुती चव्हाण, माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब देशमुख, वसंतराव देशमुख, आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी आमदार पाटील यांनी ज्या शासनाला साधी 'टीईटी'ची परीक्षा घेता येत नाही ते शक्तिपीठ महामार्ग करायला निघाल्याचा चिमटा काढत शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणावर चौफेर टीका केली.
कोल्हापूर येथे शक्तिपीठ विरोधी मोर्चा काढला त्याच दिवशी शासनाने याबाबतची अधिसूचना काढून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. त्यामुळे रस्त्यावरच्या लढाईत बायका-पोरे व जनावरंसह उतरण्याचे आवाहन त्यांनी केले.
याप्रसंगी खा राजू शेट्टी म्हणाले,नवीन शक्तिपीठ महामार्ग करून शेतकऱ्यांना उध्वस्त करण्यापेक्षा गरज असेल तर रत्नागिरी-नागपूर मार्गाचे रुंदीकरण करा. गरज नसलेल्या मार्गांवर पैसे खर्च करण्यापेक्षा पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी अडविणाऱ्या सिंचन योजना राबवा. तीर्थक्षेत्रांना जोडणारा शक्तिपीठ असे सांगत असताना संत सावता माळ्याचे गावच यात उध्वस्त होत आहे, पण ते आम्ही कदापी होऊ देणार नाही. कायदेशीर आणि रस्त्यावर लढाई लढतांना गनिमी काव्याने लढण्याचा सल्ला त्यांनी दिला. शेतकऱ्यांच्या या लढ्यात शासनाची झोप उडवू. शेतकऱ्यांच्या भावना शासनाने लक्ष्यात घेतल्या नाहीत तर आषाढी वारीच्या वेळी मुख्यमंत्र्यांचे वेगळ्या पद्धतीने स्वागत करू, असा सूचक इशारा त्यांनी दिला.
शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीचे राज्य समन्वयक गिरीश फोंडे म्हणाले की, कोणत्याही विकासाचा केंद्रबिंदू मानव असला पाहिजे. पण शेकडो शेतकरी कुटुंबाच्या डोळ्यात पाणी आणणारा शक्तिपीठ महामार्ग कदापी होऊ देणार नाही. शक्तिपीठ हा मूळ प्रश्न नसून शासनाची मानसिकता हा खरा प्रश्न आहे. बहुजनांची शक्तिपीठे हायजाक करण्याचे हे कारस्थान आहे. लोकशाही शासन व्यवस्थेत लोकांसाठी राज्य करायचे असते पण हे शासन ठेकेदारांसाठी काम करतेय, असा आरोप करून शक्तिपीठ महामार्ग शंभर जन्म घेतले तरी होऊ देणार नाही, असेही ते म्हणाले.
विकास नव्हे भकास होईल : धैर्यशील मोहिते-पाटील
प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गमुळे कोणताही विकास तर होणारच नाही पण गावेच्या गावे भकास होणार आहेत. शासनाने अशा अनावश्यक प्रकल्पावर खर्च करण्यापेक्षा शेतकऱ्यांना बारमाही पाणी आणि चोवीस तास वीज देण्यासाठी प्रयत्न करावा. त्यानंतर कोणत्याही शेतकऱ्यावर आत्महत्या करण्याची वेळच येणार नाही. या लढ्यात शेवटच्या क्षणापर्यंत शेतकऱ्यांसोबत राहणार असल्याचे खा. धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले.
या मेळाव्याला जिल्हाभरातून हजारो शेतकरी उपस्थित होते. त्यातही महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. सर्व शेतकऱ्यांनी 'एक जिद्द - शक्तिपीठ रद्द' असे लिहिलेल्या टोप्या घातल्या होत्या. यावेळी विमल कुलकर्णी, डॉ. प्रियांका मगर, ज्योती पाटील या महिलांनीही आक्रमक भाषणे केली. प्रास्ताविक महेश व्यवहारे यांनी केले. सूत्रसंचालन सचिन शिंदे यांनी केले.