सातारा : जिल्ह्यातील बहुतांश साखर कारखान्यांचे बॉयलर प्रज्वलन सोहळे अनंतचतुदर्शीला पार पडले असून लवकरच यंदाचा ऊस गाळप हंगाम सुरु होणार आहे. या पार्श्वभूमीवर विदर्भ, मराठवाड्यासह परजिल्ह्यातील हंगामी ऊसतोड मजूर जिल्ह्यात दाखल होवू लागले आहेत. गावोगावच्या मोकळ्या जागा, मैदानांवर राहुट्या टाकण्यासाठी वाढलेले गवत, झाडे-झुडपांची स्वच्छता केली जात आहे. हंगाम काळात ऊसतोड मजुरांच्या वास्तव्यामुळे ग्रामीण भागातील माळराने गजबजणार आहेत.
नगदी उत्पादन मिळवून देणारे पीक म्हणून पश्चिम महाराष्ट्रात ऊसाचे मुख्य पीक घेतले जाते. जिल्ह्यातही ऊसाचे क्षेत्र अधिक असून सुमारे १५ सहकारी व खाजगी साखर कारखान्यांमध्ये ऊस गाळप केले जाते. यावर्षी जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी असल्याने पाणी टंचाईमुळे शेतीव्यवसायातील अडचणी वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर साखर कारखान्यांचे बॉयलर प्रदीपन लवकर करण्यात आले आहे. जिल्ह्यात हंगामी ऊसतोड मजूर सहकुटुंब दाखल होत आहेत. मोजकेच प्रापंचिक साहित्य, अंथरुन-पांघरुण, अन्नधान्य अशा लवाजम्यासह ट्रक, ट्रॅक्टर अशी वाहने कारखाना कार्यस्थळासह कार्यक्षेत्रातील ग्रामीण भागात दाखल होत आहेत.
माळराने, मोकळी मैदान पाहून तेथे वास्तव्यासाठी जागा केली जात आहे. पावसाळ्यामुळे माळराने व मोकळ्या मैदानांवर गवत व झाडे-झुडपे वाढल्याने परिसराची स्वच्छता करुन मगच राहुट्या टाकण्यात येत आहेत. मोळी टाकण्याचा शुभारंभ झाला असला तरी प्रत्यक्ष ऊसतोडणी पुढील काही दिवसांत सुरु होणार आहे. आगामी काळात ऊसतोडणीसाठी येणार्या ऊसतोड मजुरांच्या वावरामुळे गावोगावची शिवारे बहरणार आहेत.
सत्रपरीक्षेपूर्वीच स्थलांतरामुळे शैक्षणिक भविष्य ऐरणीवर...
उदरनिर्वाहाचे साधन म्हणून ऊसतोड करणार्या या कुटुंबातील अनेक चिमुकली शाळेत जाणारी आहेत. दरवर्षी दिवाळीच्या तोंडावर ऊसतोडणी सुरु होत असल्याने पहिली सत्र परीक्षा देवूून शालेय मुले पालकांसोबत येतात. उर्वरीत शिक्षण साखर शाळा व परिसरातील शाळांमध्ये पूर्ण करतात. मात्र यावर्षी प्रथम सत्रपरीक्षेपूर्वीच ऊसतोड मजुरांचे स्थलांतर झाले आहे. ज्यांची गावाकडे ज्येष्ठ मंडळी किंवा जबाबदारी घेणारे नातेवाईक आहेत, अशांनी शालेय मुलांना गावाकडे ठेवले आहे. मात्र ज्यांच्या कुटुंबात मुलांची जबाबदारी घेणारे कोणीच नाही अशा पालकांची मुले सोबत आली आहेत. त्यामुळे त्यांचे शैक्षणिक भविष्य ऐरणीवर येणार आहे.