Namdev Maharaj | पंढरीत संत नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळा File Photo
सोलापूर

Namdev Maharaj | पंढरीत संत नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळा

गुरुपौर्णिमेपासून अखंड हरिनाम सप्ताह व विविध धार्मिक उत्सवास प्रारंभ

पुढारी वृत्तसेवा

पंढरपूर : भागवत धर्माची पताका संपूर्ण देशभर फडकविणारे श्री विठ्ठलाचे लडीवाळ भक्त संत शिरोमणी नामदेव महाराज व परिवार तसेच संत जनाबाई महाराज यांच्या 675 व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह व धार्मिक उत्सवास गुरुवार, दि. 10 जुलै गुरुपौर्णिमेपासून प्रारंभ करण्यात आला आहे. तर बुधवार, दि. 6 ऑगस्टपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संत नामदेव महाराजांचे वंशज ह.भ.प. माधव महाराज नामदास यांनी दिली.

संत नामदेव महाराजांचे जन्मस्थान असलेल्या संत नामदेव मंदिर येथे अखंड हरिनाम सप्ताह व धार्मिक उत्सवाला गुरुपौर्णिमेदिवशी संत पूजनाने प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर संत नामदेव महाराजांचा पालखी सोहळा गोपाळपूर येथे गोपाळकाल्यासाठी निघाला. याठिकाणी काल्याचा अभंग झाल्यानंतर वारकरी, भाविकांना काल्याचे वाटप करण्यात आले. त्यानंतर पालखी सोहळा पुन्हा मंदिरात दाखल झाला.

अखंड हरिनाम सप्ताहामध्ये पहाटे 5 वाजता काकड आरती, भजन, सकाळी 7 ते 10 वाजता संत नामदेव महाराज हस्तलिखित गाथा भजन, सकाळी 10 ते 12 वाजेपर्यंत कीर्तन, दुपारी 3.30 ते 5 वाजेपर्यंत प्रवचन व नंतर हरिपाठ, सायंकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत कीर्तन व रात्री जागर असे धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. मुख्य धार्मिक कार्यक्रमाच्या अंतर्गत सोमवार, दि. 21 जुलै रोजी दिंडीची नगर प्रदक्षिणा, मंगळवार, दि. 22 रोजी प्रसाद, बुधवार, दि. 23 जुलै रोजी संत नामदेव महाराज व संत सावता माळी यांच्या संजीवन समाधी सोहळ्यावर आधारित ह.भ.प. माधव महाराज नामदास यांचे कीर्तन होणार आहे. यादिवशी संत नामदेव पायरी व संत नामदेव मंदिरावर हेलिकॅप्टरने पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. गुरुवार, दि. 24 रोजी ह.भ.प. निवृत्ती महाराज नामदास यांचे काल्याचे कीर्तन झाल्यानंतर सायंकाळी 5 वाजता पालखी लवाजम्यासह गजारुढ दिंडीची नगर प्रदक्षिणा होणार आहे.

अखंड हरिनाम सप्ताहात मान्यवर ह.भ.प. महाराज मंडळींची कीर्तन व प्रवचन सेवा होणार आहे. तसेच श्रीमंत शितोळे सरकार, विठ्ठल स्वामी महाराज वडगावकर, रामानंद स्वामी नागपूरकर, बाळासाहेब आरफळकर, बाळासाहेब चोपदार, राजाभाऊ चोपदार (आळंदी), मदन महाराज हरिदास, महेश कवठेकर यांच्यासह मान्यवर ह.भ.प. महाराज मंडळी उपस्थित राहणार आहेत.

अखंड हरिनाम सप्ताह व धार्मिक सोहळा संत नामदेव महाराजांचे वंशज सर्वश्री ह.भ.प. माधव महाराज, मुकुंद महाराज, केशव महाराज, कृष्णदास महाराज, ज्ञानेश्वर महाराज नामदास यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होत आहे. यासाठी ह.भ.प. एकनाथ महाराज, निवृत्ती महाराज, मुरारी महाराज, विठ्ठल महाराज, हरि महाराज, भावार्थ महाराज, आदित्य महाराज यांच्यासह संत नामदेव महाराज वंशज, नामदास महाराज परिवार, संत नामदेव महाराज फड, संत नामदेव-जनाबाई महाराज सेवा प्रतिष्ठान परिश्रम घेत आहे.

मुख्यमंत्री फडणवीस राहणार उपस्थित

पंढरपूर येथे दि.23 व दि. 24 जुलै रोजी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मंत्रीगण, महाराज मंडळी, देशभरातील शिंपी समाज बांधव व संत नामदेव महाराज भक्तमंडळी उपस्थित राहणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT