शहाजी बापू पाटील, संजय राऊत (Pudhari Photo)
सोलापूर

Shahaji Bapu Patil on Sanjay Raut | संजय राऊत यांनाही गुवाहाटीला यायचं होतं, पण...; शहाजी बापू पाटलांचा गौप्यस्फोट

एकनाथ शिंदेंच्या बंडाला तीन वर्षे झाली असली तरी शहाजी बापू पाटील यांनी राऊतांबाबत विधान करून खळबळ उडवून दिली आहे

अविनाश सुतार

Shiv Sena Politics

पंढरपूर : माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड करून राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली होती. त्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पायउतार व्हावे लागले होते. या घटनेला तीन वर्षे झाली. या बंडावेळी ठाकरे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनाही गुवाहाटीला यायचे होते, पण ३० ते ३५ आमदारांनी राऊतांना विरोध केला, असा गौप्यस्फोट शिंदे शिवसेनेचे सांगोल्याचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी केला. ते आज (दि.२१) पंढरपूर येथे पत्रकारांशी बोलत होते.

पूजा करून निवडून आलो असतो, तर आम्हाला कवट्या मिळत नाहीत का? सुया मिळत नाहीत का? आपल्या देशात अनादी कालापासून पूजा यज्ञ केले जात आहेत. गोगावले यांनी आपल्या घरात पूजा केली, यात काय चुकीचे केले? असा सवाल करून पाटील यांनी मंत्री भरत गोगावले यांची पाठराखण केली. गोगावले यांच्या घरातील पूजा करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला. पण तिथे कवट्या होत्या की सुया होत्या, हे बघायला संजय राऊत गेले होते का ?, असा टोलाही त्यांनी लगावला.

उद्धव ठाकरे यांच्या मागे आता माणसे राहिलेले नाहीत. म्हणून त्यांना मनसे अध्यक्ष राजे ठाकरे यांची आठवण यायला लागली आहे. पण सुखाच्या दिवसांत त्यांची आठवण येत नव्हती, आता संकट काळात त्यांना राज ठाकरे यांची गरज भासू लागली आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांनी दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत एकत्र काम केले आहे. त्यामुळे ते दोघे आज पहिल्यांदा भेटत नाहीत. त्यामुळे शिंदे यांनी राज ठाकरे यांना भोजनाचे निमंत्रण दिले तर संजय राऊत यांना इतके वाईट का वाटू लागले आहे ? राऊत यांनी मागील अडीच वर्षात महाराष्ट्राची संस्कृती बिघडवली आहे. सुसंस्कृत महाराष्ट्र बिघडवणारा संजय राऊत जनक आहे, अशी बोचरी टीका पाटील यांनी यावेळी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT