सांगोला : अपुरी सुरक्षा व्यवस्था, बंद सीसीटीव्ही कॅमेरे याचा फायदा घेत चोरट्यांनी सांगोला विद्यामंदिर प्रशालेतील बोर्ड कस्टडीच्या स्ट्राँग रूमचे कुलूप तोडून बुधवारी (दि. 18) होणाऱ्या दहावी बोर्डाच्या भूगोलाच्या 50 प्रश्नपत्रिकांचा गठ्ठा चोरून नेला. मंगळवारी (दि. 17) सकाळी ही घटना उघडकीस आल्यावर सोलापूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळाची पाहणी केली. तसेच ठसे तज्ज्ञांना पाचारण केले. या चोरीमुळे संपूर्ण राज्य शिक्षण मंडळ हादरले आहे. या घटनेमुळे विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. आता बोर्ड काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सध्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण महामंडळाच्या परीक्षा सुरू आहेत. बुधवारी (दि. 18) भूगोलाचा शेवटचा पेपर आहे. सांगोला तालुक्यातील परीक्षा केंद्रासाठी असणाऱ्या प्रश्नपत्रिका सांगोला विद्यामंदिर प्रशाला या ठिकाणी बोर्ड कस्टडीमध्ये सुरक्षित ठेवल्या होत्या. या स्ट्राँग रूमच्या सुरक्षेसाठी एक पोलिस व दोन होमगार्ड यांची नेमणूक करण्यात आली होती. मात्र सीसीटीव्ही यंत्रणा बंद असल्याने चोरट्यांना संधी मिळाली आणि त्यांनी भूगोल विषयाच्या 50 प्रश्नपत्रिकांचा गठ्ठा लंपास केला.
मंगळवारी सकाळी 8.30 वाजता या स्ट्राँग रूम जवळ अधिकारी पोहोचल्यावर कुलूप तोडल्याचे दिसून आले. या स्ट्राँग रूम समोरील सीसीटीव्ही सध्या बंद असल्याने चोरट्यांचे कोणतेही फुटेज मिळू शकलेले नाही. चोरी होताना या ठिकाणी बंदोबस्ताला असलेला कर्मचारी कुठे होता, असा प्रश्न निर्माण झाला आहे. चोरीची माहिती मिळताच अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. प्रितमकुमार यावलकर, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे, पोलिस निरीक्षक विनोद घुगे, तहसीलदार बाळुताई भागवत, प्रभारी गटशिक्षणाधिकारी सुयोग नवले यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी पोलिस, होमगार्ड तसेच संबंधित कर्मचारी यांच्याकडे चौकशी केली.
पोलिस या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करीत असून पेपरचा गठ्ठा शोधण्याचे काम सुरू आहे. दहावीचा भूगोलाचा पेपर चोरीला गेल्याने उद्या होणाऱ्या परीक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मात्र, या प्रकारात जबाबदार असणाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी होत आहे.
अहवाल बोर्डाकडे पाठविणार
सांगोला तालुक्यातील एका परीक्षा केंद्रावरील भूगोलाच्या प्रश्नपत्रिकेचा संच चोरीला गेले आहे. त्या ठिकाणी पुणे बोर्डाचे सचिव औंदुबर उकिरडे, माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी भेट देऊन अहवाल तयार केला आहे. तो अहवाल बोर्डाकडे पाठविणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी जगताप यांनी दै. पुढारीशी बोलताना दिली आहे.
अशीची चर्चा...
दहावीच्या परीक्षेचे पेपर ठेवलेल्या ठिकाणी गेल्या दोन दिवसापासून बंदोबस्तासाठी असलेल्या होमगार्डमध्ये शाब्दिक चकमक झाल्याची चर्चा आहे. चोरीबाबत संबंधित अधिकारी व पोलीस ठाण्यात उशिरा कळविण्यात आल्याचीही चर्चा आहे.
प्रशालेच्या बदनामीची हेतू...?
सांगोला विद्यामंदिर प्रशालेची स्थापना 1952 रोजी झाली आहे या संस्थेमध्ये पाचवी ते बारावी पर्यंत पाच हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. या संस्थेचा विद्यार्थ्यांचा प्रगतीचा उच्चांक पाहता अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षा व विविध परीक्षांमध्ये गुणवंत ठरले आहेत. ही संस्था नावारुपाला आली आहे. यामुळे या संस्थेची बदनामी करण्यासाठी दहावीच्या भूगोल विषयाचे 50 पेपर चोरून नेणे हे खेदजनक आहे. हे चोरीचे प्रकरण सांगोला विद्यामंदिर प्रशालीची जाणून बुजून बदनामी करण्याचा प्रकार असल्याची चर्चा परिसरात आहे.