Sangola Revenue department staff attacked  Pudhari
सोलापूर

Solapur Crime | सांगोला येथे अवैध वाळू उत्खनन रोखताना महसूल कर्मचाऱ्यांवर हल्ला

Illegal Sand Mining Sangola | जवळा येथील पांढरेवस्ती परिसरात अवैध वाळू उत्खनन रोखण्यासाठी गेलेल्या महसूल विभागाच्या पथकावर हल्ला

पुढारी वृत्तसेवा

Sangola Revenue department staff attacked

सांगोला : सांगोला तालुक्यातील जवळा येथील पांढरेवस्ती परिसरात अवैध वाळू उत्खनन रोखण्यासाठी गेलेल्या महसूल विभागाच्या पथकावर हल्ला झाल्याची गंभीर घटना बुधवारी (दि.४) पहाटे घडली. या हल्ल्यात शासकीय वाहनाचे मोठे नुकसान झाले असून दोन कर्मचारी जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सांगोला तालुक्यातील नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा होत असल्याच्या तक्रारी महसूल विभागाकडे प्राप्त होत होत्या. त्यानुसार सांगोला मंडळाचे मंडळ अधिकारी महेश जाधव, मेडशिंगीचे तलाठी मयूर गोडसे आणि वाढेगावचे कोतवाल समाधान सूर्यगंध हे बुधवारी पहाटे सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास पांढरेवस्ती (जवळा) येथील कोरडा नदीपात्र परिसरात कारवाईसाठी गेले होते.

कारवाईदरम्यान संशयित आरोपी अतुल शंकर गावडे व इतरांनी एकत्र येत तहसीलदार सांगोला यांच्या शासकीय वाहनावर (क्र. एमएच ४५ एएल ८१७१) दगडफेक केली. या दगडफेकीत वाहनाची तोडफोड होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आल्याने दोन कर्मचारी जखमी झाले आहेत.

ही घटना अत्यंत गंभीर स्वरूपाची असून शासकीय कर्मचाऱ्यांच्या जीवितास धोका निर्माण करणारी आहे. संबंधित आरोपींवर बीएनएस २०२३ मधील कलम १३२, ११८, ३५२ व ३५१ अन्वये तात्काळ गुन्हा दाखल करून कडक कारवाई करावी, अशी मागणी महसूल कर्मचारी संघटनेने केली आहे.

जोपर्यंत संबंधित आरोपींवर कठोर कारवाई होत नाही, तोपर्यंत बेमुदत कामबंद आंदोलनात सहभागी राहणार असल्याचे निवेदन महसूल कर्मचारी संघटनेने तहसीलदार बाळुताई भागवत यांना दिले आहे. या निवेदनावर सहाय्यक महसूल अधिकारी सचिन कुंभार, राजू बनसोडे तसेच अन्य १४ कर्मचारी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

अवैध वाळू उपशामुळे वाढती दहशत

सांगोला तालुक्यातील नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा केला जात असल्याचे समोर येत आहे. या अवैध व्यवसायातून काही युवकांच्या हातात सहज पैसा येत असल्याने परिसरात दादागिरीचे प्रकार वाढल्याची चर्चा आहे. नदीकाठच्या शेतकऱ्यांना दमदाटी करणे, मोटार साहित्य चोरी करणे, पाइपलाइनचे नुकसान करणे अशा घटना वारंवार घडत असल्याचे स्थानिकांकडून सांगितले जाते.

तसेच अवैध वाळू व्यवसायातील स्पर्धेमुळे संबंधितांमध्ये वाद आणि मारामाऱ्या होत आहेत. आता शासकीय वाहनावर दगडफेक व कर्मचाऱ्यांवर हल्ला झाल्याने सांगोला सारख्या शांत तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अवैध वाळू उपसा व वाहतूक तात्काळ बंद करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT