सांगोला : दहावीचा पेपर सुटल्यानंतर आपल्या गावाकडे परतणाऱ्या 51 विद्यार्थ्यांसह शिक्षक, हॉटेल मालक, वाहन चालक यांच्यावर मधमाश्यांनी हल्ला केला. यात 54 जण जखमी झाले. सांगोला तालुक्यातील वाकी शिवणे येथे सोमवारी दुपारी 2 वा. च्या सुमारास ही घटना घडली. जखमींवर उपचार सुरू आहेत. परीक्षार्थी विद्यार्थी अचकदाणी व लक्ष्मीनगर येथील शाळेतील आहेत.
अधिक माहिती अशी की, विद्यामंदिर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज वाकी शिवणे या ठिकाणी दहावी केंद्र आहे. या केंद्रावर पेपरसाठी अचकदानी, लक्ष्मीनगर, खवसपूर व परिसरातील विद्यार्थी पेपर देण्यासाठी आले होते. या विद्यार्थ्यांना घेऊन आलेली वाहने महूद सांगोला रोडच्या कडेला असलेल्या राजू जाधव यांच्या घरासमोरील नारळाच्या व इतर झाडांच्या सावलीखाली उभी करण्यात आली होती. पेपर सुटल्यानंतर विद्यार्थी घरी जाण्यासाठी या वाहनांजवळ आले असतानाच झाडावरून मधमाशीचे मोहोळ खाली पडले. यावेळी मधमाश्यांनी अचानक या विद्यार्थ्यांवर हल्ला केला. यामध्ये आचकदानी प्रशालेतील सोळा, तर लक्ष्मीनगर प्रशालेचे 35 विद्यार्थी जखमी झाले. तर अचकदानीतील कारंडे हे शिक्षक तसेच एक हॉटेल मालक जखमी झाले. वाहन चालक अस्लम मुलांनी हे गंभीर जखमी झाले आहेत. या जखमींवर प्राथमिक आरोग्य केंद्र महूद तसेच महूद येथील खासगी रुग्णालयात तसेच सांगोला येथील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. मधमाश्यांचा हल्ला झाल्यानंतर विद्यार्थी, शिक्षक, पालक व इतर नागरिक सैरावैरा पळू लागले होते. दूरवर जाऊनही मधमाशा चावतच होत्या. यामुळे एकच हाहाकार उडाला होता.
नारळाची फांदी मोहोळावर पडल्याने मोहोळ उठले
साधारणपणे दीड ते पावणे दोन वाजण्याच्या सुमारास वाहने उभी केलेल्या ठिकाणी असलेल्या नारळाच्या झाडावर आग्या मोहोळ होते. या मोहोळावर नारळाची फांदी पडल्याने ते मोहोळ खाली पडले. नेमके त्याचवेळी या वाहनामध्ये बसून घरी जाण्यासाठी विद्यार्थी आले आणि त्यांच्यावरच मधमाश्यांनी हल्ला केला.