सांगोला : सांगोला नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये शिवसेनेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आनंदा गोरख माने 5 हजार 140 मताधिक्याने निवडून आले आहेत. तर शिवसेनेचे 15 नगरसेवक निवडून आले आहेत. यामुळे शिवसेनेची एक हाती सत्ता मिळाली तर भाजप शेकाप व दीपक साळुखे गटाला केवळ 8 जागावर समाधान मानावे लागले आहे. ही निवडणूक भाजपच्या दबावाच्या राजकारणाने नेते विरुद्ध मतदार अशी झाल्याने या निवडणुकीत रंगत आली होती. निवडणूक निकालानंतर विजयी उमेदवारांमधून आनंद उत्सव साजरा करण्यात आला.
सांगोल्यात अचानक झालेल्या वेगवेगळ्या पक्षाची युती मतदारांनी अमान्य केली आहे. सांगोल्याचा मतदार हा स्वाभिमान आणि अभिमानाने वागला आहे, याची प्रचिती या निवडणुकीत आली. सांगोला नगरपरिषद निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखाली शेतकरी कामगार पक्ष व दीपक साळुंखे पाटील गट एकत्र आले होते. त्यांच्या विरोधात शिवसेनेचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी एकाकी लढत दिली होती.
मतदानाच्या एक दिवस अगोदर शहाजीबापू यांच्या कार्यालयावर छापेमारी करण्यात आली होती. त्यामुळे सांगोल्याची निवडणूक संपूर्ण राज्यात चर्चिली गेली होती. नगरपरिषद निवडणुकीत नगराध्यक्षपदी शिवसेनेचे आनंदा माने हे विजयी झाले आहेत. नगरपरिषदेच्या 23 पैकी 15 जागांवर शहाजीबापू पाटील यांच्या पॅनेलचे उमेदवार विजयी झाले आहेत. शेकापचे 3, भाजपचे 4, दीपक साळुंखे यांच्या गटाचा 1 उमेदवार विजयी झाला आहे.
सांगोला नगरपालिका निवडणुकीमध्ये शेकापने मारुती बनकर यांना उमेदवारी जाहीर केली होती. पण ऐनवेळी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मारुती बनकर यांना भाजपमध्ये घेऊन भाजपमध्ये उमेदवारी दिली. यामुळे शेकापमध्ये कलह झाला. त्याचबरोबर भाजप व दीपक साळुंखे पाटील यांच्या गटाला ही भाजपच्या उमेदवाराला मदत करण्यासाठी भाग पाडले. यामुळे शहरातील मतदार वैतागून गेला. ऐनवेळी सर्व नेतेमंडळी एकत्र आली व शिवसेना वेगळी पडली. तसेच शिवसेनेला धनुष्यबाण हे सर्व उमेदवारांना चिन्ह मिळाले. भाजपकडून नगराध्यक्ष पदाचे उमेदवार यांना कमळ हे चिन्ह दिले. पण नगरसेवक पदांना वेगवेगळी भिन्न अशी चिन्हे मिळाली. यामुळे प्रचार यंत्रणा त्यांना व्यवस्थित राबवता आली नाही. याचा फायदा शिवसेनेचे उमेदवारांना झाला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सांगोला नगरपालिकेच्या निवडणुकीत लक्ष घातले. जाहीर सभा ही घेतल्या. तसेच भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार यांनीही व शेकापचे आमदार बाबासाहेब देशमुख यांनी तसेच माजी आमदार दीपक साळुंखे पाटील यांनीही या निवडणुकीत आपली प्रतिष्ठा पणाला लावली. पण मतदारांनी त्यांना झुगारून शिवसेनेला मदत केली. यामुळे नगरपालिकेवर शिवसेनेचा झेंडा फडकला आहे.
निवडणूक निकाल ऐकण्यासाठी कार्यकर्त्यांनी व मतदारांनी मोठी गर्दी केली होती. सर्व निवडणूक उमेदवारांना मतमोजणीच्या ठिकाणी येऊ दिले नाही. त्यांचे प्रतिनिधी मतमोजणी त्या ठिकाणी होते. निवडणुकीच्या दोन फेऱ्या झाल्यानंतर व पराभव समोर दिसताच भाजपचे उमेदवार मारुती बनकर व भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते बाळासाहेब एरंडे यांनी मतदानाच्या ठिकाणाहून निघून गेले.
मतमोजणीच्या वेळी पहिल्या फेरीपासूनच आनंदा माने हे लीड वर होते. त्या वेळेपासून त्यांच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करीत फटाके फोडत आनंद साजरा केला. निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर निवडून आलेल्या नगराध्यक्ष, सर्वनगरसेवक यांची शहरातून आनंदोत्सव मिरवणूक काढण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते या उत्सवात सामील झाले होते.