सांगोला : शहरातील मोकाट जनावरांबाबत नागरिकांच्या वाढत्या तक्रारीच्या अनुषंगाने सांगोला नगरपालिकेने विशेष मोहीम हाती घेतली आहे. मोकाट जनावरांना पकडून शिरभावी येथील फॉरेस्ट क्षेत्रात सोडण्यात येत आहे. आज अखेर 60 मोकाट जनावरांना बंदिस्त वाहनांमध्ये पकडून फॉरेस्ट क्षेत्रात सोडण्यात आल्याची माहिती नगरपालिका आरोग्य विभागाचे निरीक्षक विनोद सर्वगोड यांनी दिली आहे.
सांगोला शहरातील मोकाट जनावरांचा मुद्दा चांगला चर्चेत आला. मोकाट जनावरे रस्त्याच्या मध्यभागी बसतात, त्यामुळे अपघातांची संख्या वाढत असल्याबाबत तक्रारी प्राप्त होत होत्या. तसेच मोकाट जनावरे आणि दुकानदारांच्या दुकानासमोर झुंज पकडत असल्यामुळे अनेकदा व्यापार्यांचे नुकसान झाल्याच्याही तक्रारी नगरपालिका प्रशासनाकडे मिळाल्या होत्या.
नागरिकांच्या या तक्रारीची दखल घेत, सांगोला नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. सुधीर गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य प्रशासनाने कर्मचार्यांचे विशेष पथक तयार करण्यात आले. यामध्ये मोकाट जनावरांचा शोध घेऊन सदर मोकाट जनावरांना बंदिस्त वाहनांमध्ये घेऊन शिरभावी-धायटी येथील फॉरेस्ट क्षेत्रावर सोडण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
नगरपालिकेच्या या मोहिमेमध्ये आजअखेर एकूण 60 जनावरांना फॉरेस्ट क्षेत्रावर सोडण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. यापुढेही सदरची कार्यवाही सुरूच राहणार आहे. शहरातील उर्वरित मोकाट जनावरांना फॉरेस्ट क्षेत्रावर सोडण्यात येणार आहे.- विनोद सर्वगोड, आरोग्य विभाग निरीक्षक